कुठलेही प्रशिक्षण न घेता जळगावच्या महिला उद्योजकांची गगन भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:52 PM2018-03-04T14:52:26+5:302018-03-04T14:52:26+5:30
जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योगांनी गगन भरारी घेतली आहे. यात महिला उद्योजकही मागे नाहीत, यापैकी अनेकांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उद्योगात यश मिळविले आहे.
- चुडामण बोरसे
जळगाव : जळगाव जिल्ह्यात अनेक उद्योगांनी गगन भरारी घेतली आहे. यात महिला उद्योजकही मागे नाहीत, यापैकी अनेकांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळून उद्योगात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक महिला उद्योजकांनी कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले नाही, तरीही त्यांच्या उद्योगाची यशाकडे वाटचाल सुरु आहे.
प्रा. संजय वसंत भामरे यांनी ‘जळगाव जिल्ह्यातील महिला उद्योजकांच्या समस्यांचा अभ्यास’ याविषयावर पीएच.डी. मिळविली आहे. प्रा.भामरे हे जळगावच्या कला, वाणिज्य व गृहविज्ञान महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यासाठी त्यांना महाविद्यालयाच्या तत्कालीन प्राचार्या डॉ. मंगला जंगले यांचे मार्गदर्शन मिळाले. या शोध निबंधासाठी जिल्ह्यात कार्यरत महिला उद्योजकांपैकी १६० महिला उद्योजकांचा हा सॅम्पल सर्वे करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात अनेक मोठे, मध्यम आणि लघुउद्योग सुरु झाले. लक्ष्मी नारखेडे ह्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला उद्योजक. त्यांनी सन १९७० मध्ये आपल्या उद्योगाची सुरुवात केली. यानंतर अनेक महिला उद्योजक या क्षेत्रात आल्या आहेत.
जिल्ह्यात सन २०११ च्या जनगणनेनुसार महिलांची संख्या २०.३२ लाख होती. पुढे महिला शिक्षणाचे प्रमाण वाढले. नियमित शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षण देणाºया संस्था वाढल्या. औद्यागिक शहराच्या तुलनेत महिला उद्योजकांचे प्रमाण १६.४२ टक्के इतके कमी आहे. जिल्ह्यात सन १९९० नंतर महिला उद्योजकांच्या संख्येत वाढली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत १९९९ पासून बचत गट स्थापन करण्यात आले. या बचत गटामार्फत विविध वस्तूंची निर्मिती होऊ लागली. जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी उद्योग उभे राहिले आहेत. त्यात ४,२८२ सूक्ष्म उद्योग, ५२६ लघुउद्योग, १६ मध्यम आणि १६ मोठ्या उद्योगांचा समावेश आहे. यात पदवीधर महिला उद्योजकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे महिला उद्योजकांमध्ये संयुक्त कुटुंब असलेल्या उद्योजकांचे प्रमाण जास्त आहे.
पतीचे पाठबळ आणि प्रेरणा असेल तर महिला उद्योजक कुठलीही जोखीम घेण्यास तयार असतात. सॅम्पल सर्वे करण्यात आलेल्या महिला उद्योजकांपैकी निम्म्या उद्योजकांनी कुठलेही तांत्रिक प्रशिक्षण घेतले नसल्याचे आढळून आले आहे. बाजारपेठेत उत्पादनांची विक्री करताना महिला उद्योजकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
महिला उद्योजकांना उद्योग अथवा व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यात स्वत:ची जागा, औद्योेगिक वसाहत किंवा सहकारी औद्योगिक वसाहतीकडून जागा उपलब्ध होते. स्वत:ची जागा असेल तर अडचणी येत नाहीत. पण इतर ठिकाणी जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील महिला उद्योजकांच्या उद्योगांविषयी माहिती एकत्र करुन ही माहिती संकलित करण्यात आली आहे. सांख्यिकी आणि वर्णनात्मक माहितीवर आधारित निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली होती.
महिला उद्योजकांच्या उत्पादनाला वाव मिळावा आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सरकारनेच उत्पादन विकत घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, यामुळे या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होईल. तसेच उद्योगाला अखंडित वीजपुरवठा मिळावा आणि वीजेचे दर कमी केल्यास या महिला उद्योजकांना नक्कीच मदत होणार आहे.
- प्रा.संजय वसंत भामरे, संशोधक.