गजानना अवलिया, अवतरले जग ताराया!
By admin | Published: June 8, 2014 12:42 AM2014-06-08T00:42:58+5:302014-06-08T00:52:58+5:30
‘गण गण गणांत बोते’च्या गजरात पालखीचे भव्य स्वागत
अकोला - सनई चौघड्यांचे स्वर.. ढोल ताशांचा गजर.. रांगोळ्यांनी सजलेले रस्ते.. फुलांची उधळण अन् ह्यगण गण बोतेह्णच्या जयघोषात शनिवारी शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन झाले. माऊलीच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. श्रींच्या आगमनाने राजेश्वर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. शनिवारी सकाळी गोडबोले प्लॉटस्थित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पालखीचे वारकर्यांसोबत आगमन झाले. या ठिकाणी मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी विणेकरींचा सत्कार करण्यात आला. जेवणानंतर पालखी शहराकडे निघाली. पालखीमध्ये वारकरी टाळ मृदंगासह सहभागी झाले होते. हाती भगवा झेंडा अन् मुखात गजाननाचे नाम असलेल्या वारकर्यांचेही भक्त दर्शन घेत. पालखी डाबकी रोडवरील गजानन चौक, संत ज्ञानेश्वर मंदिर, कस्तुरबा गांधी दवाखाना, शिवचरण मंदिर, विठ्ठल मंदिर, मोठे राम मंदिर, टिळक रोड, मंगलदास मार्केट, आकोट स्टँड, संतोषी माता मंदिर, दीपक चौक, कलाल चाळ, जुने वाशिम स्टँड, चांदेकर चौक, पंचायत समिती, कालंका माता मंदिर, स्वावलंबी विद्यालय मार्गे निघाली. पालखी आणि मुंगीलाल बाजोरिया विद्यालय येथे मुक्कामी राहणार आहे.