गणेशोत्सव :...म्हणून या गावातील ग्रामस्थ चतुर्थीला करत नाहीत घरगुती गणपतीचं पूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 03:00 PM2020-08-22T15:00:16+5:302020-08-22T15:01:21+5:30
गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये कोकणामध्ये घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही.
सिंधुदुर्ग - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने नियमांच्या चौकटीत राहून गणपतीचे पूजन केले जात आहे. त्यातही गणेशोत्सवाचा विशेष उत्साह दिसून येतो तो कोकणामध्ये कोकणामध्ये घरगुती गणपतींची स्थापना करण्याची मोठी परंपरा आहे. मात्र याच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक असे गाव आहे जिथे गणेश चतुर्थीला घरगुती गणपतीची पूजा केली जात नाही.
या गावाचं नाव आहे कोईळ. मालवण तालुक्यात असलेल्या या गावामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जात नाही. या गावात सुमारे साडे तीनशे ते चारशे घरे आहेत मात्र यापैकी एकाही घरात गणेश चतुर्थीला गणपती आणला जात नाही. याचं कारण म्हणजे या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे. गावातील रहिवाशा्ंनी गावातील याच गणपतीचं पूजन करावं, असा दंडक येथे शेकडो वर्षांपासून पाळला जात आहे. घरी गणपतीची पूजा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये अनेक अडथळे येतात, असे ग्रामस्थांकडून सांगितले जाते.
या गावाता अजूनही घरगुती गणपती आणला जात नाही. घरगुती गणपतीऐवजी गणेशोत्सवादरम्यान गावातील गणेश मंदिरात सात दिवस उत्सव साजरा केला जातो. यादरम्यान, गावातील मंडळी, तसेच बाहेरगावी राहणारे चाकरमानी गावात येतात. यावेळी गावच्या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होते.
दरम्यान, या गावातील ग्रामस्थ जसे घरी घरगुती गणपतीची पूजा करत नाहीत. तसेच येथील घरांमध्ये गणपतीच्या तसबिरीसुद्धा लावल्या जात नाहीत. घरांमध्ये इतर देवतांचे फोटो ठेवले जातात. तसेच वेळेप्रसंगी सत्यनारायणाची पूजाही होते. मात्र घरी गणपतीची पूजा होत नाही. तसेच गावातील कुठल्याही मंगलप्रसंगी सर्वप्रथम या मोरयाला मान दिला जातो.