औरंगाबाद : छावणी परिसर गॅस्ट्रोने थैमान घातले असून रुग्णांची संख्या तब्बल ४ हजारांवर गेली आहे. अवघ्या सहा दिवसांत १०० वरून चार हजार रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे छावणी परिषदेबरोबर आरोग्य विभागही अडचणीत आला आहे.छावणी सामान्य रुग्णालयात १० नोव्हेंबरला गॅस्ट्रोचा पहिला रुग्ण दाखल झाला होता. प्रारंभी अन्नपदार्थाद्वारे (फूड पॉयझिनिंग) त्रास झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. त्यानंतर रुग्णांची संख्या मात्र वाढतच गेली. ११ नोव्हेंबरला रात्री उशिरापर्यंत रुग्णांच्या रांगा लागल्या. शनिवारी रात्री महापालिका, घाटी रुग्णालयाची मदत घेता आली नाही.सहा दिवसांत रुग्णसंख्या ४ हजार ३२२ वर पोहोचली, तर १ हजार ४२५ जणांना सलाइन लावण्यात आले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे छावणी परिषदेचे उपाध्यक्ष संजय गारोल यांनी सांगितले.जंतूमुळे की, विषाणूमुळे गॅस्ट्रो?पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) चार सदस्यीय पथकाने मंगळवारी रुग्णालयास भेट देऊन परिसरातील पाण्याचे तसेच इतर काही नमुने घेतले. बुधवारी काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली. त्यातून गॅस्ट्रोचा प्रसार जंतुमुळे झाला की, विषाणूमुळे, हे समजण्यास शक्य होईल.
औरंगाबादमध्ये गॅस्ट्रोचे थैमान, चार हजार रुग्ण : सहा दिवसांनंतरही नियंत्रण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:17 AM