माहुली गडावर दारू पार्ट्यांना ऊत

By admin | Published: September 10, 2016 03:11 AM2016-09-10T03:11:11+5:302016-09-10T03:11:11+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईत शहापूर तालुक्यातील माहुली गडाची भूमिका महत्त्वाची होती.

Get rid of alcohol parties at Mahuli Fort | माहुली गडावर दारू पार्ट्यांना ऊत

माहुली गडावर दारू पार्ट्यांना ऊत

Next

मुरलीधर भवार,

कल्याण- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईत शहापूर तालुक्यातील माहुली गडाची भूमिका महत्त्वाची होती. परंतु, सध्या या गडावर येणारे पर्यटक सर्रासपणे दारूपार्ट्या करत आहेत. त्यामुळे गडाचे पावित्र्य भंग होत आहे. गडावरील हे गैरप्रकार रोखण्यासाठी जाणता टायगर ट्रेकर्सने राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र, सरकारने हे प्रकार रोखण्यासाठी कायदा नसल्याची बोळवण केली आहे. शहापूर पोलिसांनी त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे केले आहे. उलट, दारू पार्टी सुरू असल्याचे आढळल्यास आम्हाला कळवा, आम्ही ती रोखण्यासाठी जाऊ, असे आश्वासन ट्रेकर्सना दिले आहे. सरकार व पोलिसांच्या या भूमिकेमुळे ट्रेकर्सने आश्चर्य व्यक्त केले आहे.
जाणता फाउंडेशन प्रतिष्ठान व जाणता टायगर ट्रेकर्स या दोन्ही संस्थांचे काम काही तरुण पाहतात. विक्रोळी येथे राहणारे प्रभाकर ताम्हणकर हे २००९ पासून या ट्रेकर्सचे काम करतात. या संस्थेत कल्याणचे दीपक गोवर्धने, रोहित महाले, सुनील चव्हाण आदी तरुणही आहेत. जाणता टायगर ट्रेकर्सने २००९ पासून आतापर्यंत राज्यातील जवळपास ७५ पेक्षा जास्त गड-किल्ले सर केले आहेत. ते दरवर्षी दोनदा माहुली गडाची मोहीम आखत आहेत. गेल्या वर्षापासून गडाच्या पायथ्याशी व माथ्यावर दारूपार्टी रंगत असल्याचे त्यांनी सांगितले.
कळसूबाई हे राज्यातील सर्वोच्च शिखर, तर माहुली गड ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच शिखर आहे. या गडाची उंची दोन हजार ७०० फूट आहे. या गडावर शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता. शिवकाळात दळणवळणाची साधने नसल्याने हा गड शहाजीराजे यांना सोयीचा वाटला नाही. त्यामुळे त्यांनी जिजाऊंना शिवनेरी गडावर पाठवले. महाराजांनी स्वराज्याच्या लढाईत तह केला, तेव्हा तहात महाराजांनी २३ गड-किल्ले बादशहाला दिले होते. त्यापैकी माहुली हा एक होता. माहुली गडाच्या पायथ्याला देवदेवतांची मंदिरे आहेत. गडाच्या माथ्यावर महाराजांचा पडका वाडा आहे. गडाच्या पायथ्याशी झोपड्या आहेत. काही दुकाने आहेत. तेथे पर्यटकांची जेवणाची व्यवस्था केली जाते. हीच मंडळी दारूची विक्री करते. त्यामुळे दारू पार्ट्यांना गड परिसरात ऊत आला आहे.
दारूपार्टी रोखण्यासाठी गडाच्या पायथ्याशी ट्रेकर्स ग्रुपने २७ जुलैला आंदोलन केले. तसेच एक निवेदन शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिले. पोलिसांनी त्यांच्याकडे केवळ ४० कर्मचारी असल्याचे सांगितले.
गडाच्या पायथ्याशी व गडावर २४ तास बंदोबस्त ठेवणे शक्य नाही. दारू पार्टी निदर्शनास आल्यावर ट्रेकर्सनी फोन केल्यावर आम्ही तेथे पोहोचून पर्यटक खरोखरच बाटलीतून ज्यूस पितात की मद्य, याची पाहणी करू. त्यात ते मद्य पीत असल्याचे आढळल्यास कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Get rid of alcohol parties at Mahuli Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.