आरमोरी (गडचिरोली) : नागपूरहून गडचिरोलीकडे येणाऱ्या इंडिका कारला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टेम्पोने जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास देऊळगाव येथे घडली.मृतांमध्ये गडचिरोली व चंद्रपूर जिल्हा फिंगरप्रिंटस् विभागाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक मनोज जनार्दन धारणे (४०), विमल जनार्धन धारणे (५५), वनिता प्रवीण धारणे (२५), हर्षिता प्रवीण धारणे (अडीच वर्षे), रिद्धी प्रशांत धारणे (चार महिने) यांचा समावेश आहे. या अपघातात सुषमा मनोज धारणे (३१) व ईशिका मनोज धारणे (अडीच वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या वेळी मनोज धारणे स्वत: वाहन चालवीत होते. अपघातानंतर टेम्पो चालक सलीम रफिक पठाण (३०, जि. गोंदिया) हा स्वत: आरमोरी पोलीस ठाण्यात हजर झाला. प्रशांत जनार्दन धारणे यांची पत्नी सारिका या नागपूर येथे रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना रविवारी हैदराबाद येथे आॅपरेशनसाठी नेले जाणार होते. तत्पूर्वी त्यांना भेटण्यासाठी मनोज धारणे त्यांची आई विमल, पत्नी सुषमा, वहिनी वनिता, सारिकाची मुलगी रिद्धी यांच्यासह कुटुंबातील लहान मुलांना घेऊन शनिवारी सकाळी नागपूरला गेले होते. रात्री ते इंडिका कारने गडचिरोलीकडे परत निघाले होते. आरमोरी-गडचिरोली मार्गावर देऊळगावजवळ चालकाने टेम्पोचा वेग कमी न केल्याने तो समोरून येऊन कारवर आदळला. धडकेत कारचा चेंदामेंदा झाला. चालकाची सीट मागच्या सीटपर्यंत पोहोचली होती. गावकऱ्यांनी कारचे चारही दरवाजे तोडून जखमी सुषमा व ईशिका यांना बाहेर काढले. (वार्ताहर)
कुटुंबातील पाच जणांवर काळाचा घाला
By admin | Published: December 14, 2015 2:30 AM