‘गुड मॉर्निंग पथकांनी संवेदनशीलता बाळगावी’ : राज्य महिला आयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:53 AM2017-10-12T03:53:02+5:302017-10-12T03:53:41+5:30
स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी
मुंबई : स्वच्छ भारत अभियान अथवा हागणदारीमुक्त योजना राबविताना अधिका-यांनी आततायीपणा करू नये. योजना आणि त्यामागील हेतू चांगला असला तरी महिलांविषयी प्रकरणे हाताळताना संवेदनशीलता बाळगावी, असे निर्देश राज्य महिला आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.
जिल्हा हागणदारीमुक्त योजनेतील ‘गुड मॉर्निंग’ पथकांच्या अतिउत्साही कारभारामुळे महिलांना विशेषत: गर्भवती महिलांना त्रास होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनीच उघड्यावर शौचास जाणाºया महिलांचा सत्कार केल्याचा प्रकार समोर आला. याबाबतचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले. याची दखल घेत राज्य महिला आयोगाने सोलापूर जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून दक्षता घेण्याची सूचना केली आहे. स्वच्छता अभियानाचा हेतू चांगला असून अनेक अधिकारी यात चांगले काम करतात. कारवाई करताना आततायीपणा करून महिलेला शरम, लज्जा वाटेल असा प्रकार घडू नये. महिलेचे नाव, फोटो, चित्रण किंवा ओळख उघड होईल असे प्रकार करू नयेत, अशा सूचना आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोलापूर जिल्हाधिकाºयांना दिल्या.
सोलापूर जिल्हाधिकाºयांसोबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना पत्र पाठवून स्वच्छता मोहीम, जिल्हा हागणदारीमुक्त अभियान राबविताना काळजी घेण्याचे तसेच महिलांबाबत संवेदनशीलता बाळगण्याचे निर्देशही रहाटकर यांनी दिले आहेत.
आज महिलांच्या प्रश्नांवर जनसुनावणी
ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींच्या निवारणासाठी गुरुवारी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता जनसुनावणी होणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना मुंबईत येऊन तक्रार करणे, सुनावणीस उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. त्यामुळे आयोगाच्या वतीने ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.