जमीर काझी मुंबई : सण व उत्सवाच्या वेळी बंदोबस्तामध्ये पोलिसांच्या बरोबरीने राबत असलेल्या गृहरक्षकांसाठी (होमगार्ड) एक शुभवार्ता आहे. १२ वर्षांपर्यंतच त्यांची सेवा घेण्याच्या अटीला राज्य सरकारने तात्पुरती स्थगित दिली आहे. त्यामुळे जास्त वय असलेल्या अनेक होमगार्ड्सचा पुन्हा सेवेत रूजू होता येणार आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाने मंगळवारी राज्यातील जिल्हा समादेशकांना दिले आहेत.तरुण, सशक्त व गरजू उमेदवारांना संधी मिळावी, म्हणून होमगार्डच्या एका जवानाला जास्तीत जास्त बारा वर्षेच काम देण्याचा निर्णय २०१०मध्ये होमागार्ड विभागाने घेतला होता. त्याचे पुनरावलोकन राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. मात्र, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा समादेशकांनी जुन्या उमेदवारांची वैद्यकीय व शारीरिक क्षमतेबाबत तपासणी करून, त्यांची जिल्हा होमगार्ड संघटनेकडे नोंदणी करावी, असे आदेश गृहविभागाने दिले आहेत.
...अन् अपर अधीक्षक चक्रावलेराज्यात होमगार्डचे जिल्हा समादेशक पदाची जबाबदारी, संबंधित जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अपर पोलीस अधीक्षकांकडे आहे. आता त्यांनी १२ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या होमगार्डना पुन्हा नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करावयाची आहे. मात्र, त्याबाबतचे निकष, होमगार्डच्या शारीरिक क्षमतेची निवड व भरती याबाबत प्रक्रिया कशी घ्यावयाची, याबाबत काहीच कळविण्यात न आल्याने अपर अधीक्षक चक्रावून गेले आहेत.राज्यात होमगार्डची पुरुष व महिला उमेदवारांची संख्या ३० हजारांवर आहे. १२ वर्षांपर्यंत कार्यकाळाची मुदत निश्चित केल्यानंतर जवानांची कमतरता पडू नये, यासाठी गेल्या तीन वर्षांत ५ हजारांवर जवानांची निवड करण्यात आली आहे. आता जुन्या उमेदवारांना पुन्हा संधी द्यावयाची असल्याने, होमगार्डच्या संख्येत वाढ होणार आहे.