मुंबई : राज्यभरात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत २ कोटी ३० लाख ६० हजार ४४० बालकांना लस देण्यात आली आहे. दररोज राज्यभरात साधारणत: १0 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात राज्यातील वस्त्यांमध्ये ही लस देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.या मोहिमेत राज्यभरात एकूण ३ कोटी १० लाख ७१ हजार ८१३ बालकांना लसीकरण करण्याचे ध्येय बाळगले आहे, तर पालिका पातळीवर हेच ध्येय २ कोटी ६ लाख ५५ हजार ३४ एवढे आहे.शाळांमध्ये सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान मुंबई शहर-उपनगरातील ३ हजार ३९६ शाळांमध्ये जाऊन जवळपास १२ लाख ४६ हजार ३३४ बालकांना लस देण्यात आली आहे. आता पालिका आणि जिल्हा पातळीवर झोपडपट्ट्या, वस्त्यांमध्ये आरोग्य विभागाची चमू जाऊन बालकांना लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष रेवणकर यांनी दिली.
गोवर-रुबेला लसीकरण मोहीम वस्त्यांमध्ये राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 1:47 AM