सरकारची हाताची घडी! पंतप्रधान मोदींचे तोंडावर बोट..!
By admin | Published: May 10, 2015 12:05 AM2015-05-10T00:05:09+5:302015-05-10T00:05:09+5:30
रोज नवी वादग्रस्त विधाने करून पक्ष आणि आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा काही मंत्री, भाजपा खासदार व नेत्यांनी जणू चंगच बांधला आहे
रोज नवी वादग्रस्त विधाने करून पक्ष आणि आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा काही मंत्री, भाजपा खासदार व नेत्यांनी जणू चंगच बांधला आहे. आगखाऊ विधानांप्रमाणेच कमालीच्या असंवेदनशील वक्तव्यांचा भडिमार वर्षभराच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात अनुभवास आला. संबंधित नेत्यांच्या बोलभांडपणास काही मर्यादाच राहिलेली नाही. विशेष म्हणजे या बोलघेवड्या नेत्यांच्या विधानांपासून स्वत:ला नामानिराळे करण्यापलीकडे सरकार वा भाजपाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. कदाचित याचमुळे सरकार व पक्षाला अडचणीत आणणाऱ्या नेत्यांची बेमुर्वतखोर मुक्ताफळे सुरूच आहेत. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यासोबतच भाजपा नेते-मंत्री व खासदारांच्या वादग्रस्त विधानांना सुरुवात झाली. अगदी अलीकडे आत्महत्या करणारे शेतकरी भेकड आणि गुन्हेगार असतात, असे वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्य हरियाणाचे कृषिमंत्री आणि भाजपाच्या शेतकरी मंचचे माजी अध्यक्ष ओ.पी. धनकर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला. भाजपा पक्षश्रेष्ठींकडून वारंवार ‘सांभाळून बोला’ अशी ताकीद दिली जात असतानाही या पक्षाच्या नेत्यांचा वाचाळपणा अद्याप थांबायचे नाव नाही. मोदी सरकारच्या वर्षभराच्या काळात हा ‘सिलसिला’ कायम आहे. बोलभांड नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकार आणि पक्षावर अनेकदा नामुश्कीची वेळ ओढवली. लष्करप्रमुख राहिलेले परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी तर थेट प्रसारमाध्यमांवरच गरळ ओकली होती. ‘पूर्वग्रहदूषित व पक्षपाती वागणाऱ्या ‘प्रेस्टिट्यूट’कडून (प्रसारमाध्यमे) तुम्ही काय अपेक्षा करणार,’ असे टिष्ट्वट त्यांनी केले. प्रेस्टिट्यूट हा शब्द प्रॉस्टिट्यूट (वेश्या) या शब्दात सुरुवातीचे अक्षर बदलून तयार केला आहे. त्यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर मी ‘प्रॉस्टिट्यूट’ नाही तर ‘प्रेस्टिट्यूट’ म्हटल्याचे सांगून त्यांनी सारवासारव चालवली आहे. शब्दकोशात ‘प्रेस्टिट्यूट’ हा शब्दच नाही. याउपरही सिंह यांनी यापूर्वी अनेकदा या शब्दाचा वापर केलेला आहे. त्यांच्या या विधानाने भाजपाच नाही, तर मोदी सरकारही अडचणीत आले. मात्र हे सिंह यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून भाजपाने हात वर केले.