सांगली - शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मंत्रालयाला जाळी बसवून मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले. ही शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, एक वर्षापूर्वी सुकाणू समितीच्या राज्यव्यापी आंदोलनापुढे मुख्यमंत्र्यांना झुकावे लागले. त्यांनी आंदोलनाची दखल घेऊन बरीच आश्वासने दिली, मात्र त्यातील एकाचेही पालन त्यांनी केले नाही. परिणामी वर्षभर शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतच राहिले. धर्मा पाटील यांना मंत्रालयासमोर आत्महत्या करावी लागली. अशावेळी संबंधित शेतकºयांच्या प्रश्नावर उपाय शोधण्याऐवजी मंत्रालयासमोर कुणी आत्महत्या करू नये म्हणून जाळी बसविण्याचा उपाय शोधला. इतका वेडेपणा दर्शविणारा मुख्यमंत्री आम्ही आजवर पाहिला नाही. शेतकºयांच्या आत्महत्येची ही कुचेष्टा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी साहेबराव कर्पे-पाटील ते धर्मा पाटील आदींसह विविध आंदोलनांमध्ये हौतात्म्य आलेल्या शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी सुकाणू समितीसह शेतकºयांकडून १९ मार्चला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व अन्नादात्यांच्या हक्कासाठी एक दिवस अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्मे, हैदराबाद-गोवामुक्ती संग्रामातील हुतात्मे, शेतकरी आंदोलनामधील हुतात्मे, पवना धरणग्रस्त हुतात्मे आदींना अभिवादन करण्यात येणार आहे. वर्षभर शांतता बाळगल्यानंतर आता पुन्हा सुकाणू समितीमार्फत शेतकºयांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. आता मुख्यमंत्र्यांचे आश्वासन आम्हाला नको, निर्णयांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अमित शिंदे म्हणाले की, जिल्हा सुधार समितीसुद्धा शेतकरी संघटनांच्या या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहे. सांगलीत १६ रोजी बैठकसांगलीत येत्या १६ फेब्रुवारीस मार्केट यार्डातील वसंतदादा शेतकरी भवनात सुकाणू समितीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात शेतकºयांच्या विविध प्रश्नावर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, अशी माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांसाठी शेरमुख्यमंत्र्यांना उद्देशून रघुनाथदादांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत एक शेर सादर केला. मुहाओजोंसे नही रुकती मौत, वो दरवाजे बंद कर दो, जहॉँ से आती है मौत! सध्याच्या परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांनी या शेरचा विचार धोरण ठरविताना करावा, असे पाटील म्हणाले.
मंत्रालयात जाळी बसवून सरकारने केली शेतक-यांच्या आत्महत्येची कुचेष्टा - रघुनाथदादा पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 8:39 PM