राजसत्तेकडून चित्र, शिल्पकारांची उपेक्षा - नितीन देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 01:04 AM2019-02-06T01:04:16+5:302019-02-06T01:05:13+5:30
इतर ललित कलांच्या तुलनेत चित्र आणि शिल्पकलेतील कलांची उपेक्षा राजसत्तेने केली आहे. केंद्राच्या पुरस्कारांमध्ये चित्रकार, शिल्पकारांना फारसे स्थान दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
- विश्वास मोरे
पिंपरी : इतर ललित कलांच्या तुलनेत चित्र आणि शिल्पकलेतील कलांची उपेक्षा राजसत्तेने केली आहे. केंद्राच्या पुरस्कारांमध्ये चित्रकार, शिल्पकारांना फारसे स्थान दिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे़ कलासंवर्धनासाठी व्यापक दृष्टी आणि धोरण राबविण्याची गरज आहे़ कलाकार हा केवळ फित कापण्यासाठी हवा असतो. मात्र, काही देण्याची वेळ आली की? मग संकुचितपणा पुढे येतो. कला आणि कलावंत कोणतीही असो त्या कला आणि कलाकारांची बूज ठेवायला हवी, असे परखड मत प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. महाराष्टÑ सरकारच्या वतीनेही महाराष्टÑ भूषण आणि राज्य पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारात लोककला आणि ललितकलांतील चित्रकला, शिल्प आणि वास्तुकला यांना फारसे स्थान दिले जात नाही. लोककला आणि ललित कलांची होणारी उपेक्षा याबाबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी कलाविषयक सामाजिक व राजकीय मानसिकता स्पष्ट केली. पारंपरिक विद्यापीठीय शिक्षणपद्धतीत बदल करण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्राच्या आणि राज्याच्या विविध पुरस्कारांत चित्रकार, शिल्पकारांची उपेक्षा होत आहे का?
-होय, निश्चितच. ललित कलांतील चित्रपट आणि संगीत, नाटक या कलांचा जेवढा विचार केला जातो. तेवढा विचार चित्रकार आणि शिल्पकारांविषयी केला जात नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. संस्कृती जपण्याचे वाढविण्याचे काम कला आणि कलावंतांनी केले आहे. हे त्रिकालातीत सत्य आहे. मात्र, आपल्यावर अन्याय होतोय ही कलावंतांची भावना निश्चितच धोकादायक आहे. याचा विचार राजसत्तेने करायला हवा. राजकीय कार्य आणि जवळीक हा निकष लावला जातो. तो लावू नये. कलावंत हा पोट तिडकीने काम करीत असतो. मग त्याचे कौतुक करण्यात संकुचितपणा नसावा, सर्वांना समान न्याय हवा. कलावंतास पैशांपेक्षा रसिक आणि पुरस्काराची दाद मिळणे गरजेचे असते. महाराष्टÑात अनेक मोठे चित्रकार आणि शिल्पकार आहेत. त्यांचा गौरव व सन्मान करायला हवा.
ज्यांना आवश्यक आहे, त्यांना सरकार काही देत नाही. ज्यांना गरज नाही, त्यांच्यावर पुरस्कारांची खैरात होते. पुरस्कारांचे व्यापकत्व वाढायला हवे. लोककला आणि ललित कलांतील सर्व घटकांचा विचार पुरस्कारात करायला हवा. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे. पुरस्कार हे योग्य वेळेतच द्यावेत. त्यातून चांगले काम करण्याची उमेद कलाकाराला निर्माण होते. लोककला आणि ललित कलांतील चित्रकार, शिल्पकारांची पुरस्कारात होणारी उपेक्षा ही सुज्ञ सरकारने थांबवायला हवी.
आपण राबविलेली कौशल्य विकास योजना काय?
-कर्जत येथे मी चित्रनगरीची निर्मिती केली आहे. त्यातून चांगल्या कलाकृती घडाव्यात, असा उद्देश आहे. कौशल्य विकास अंतर्गत मी २७ गावांतील लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. रोजगार निर्मिती होऊन लोकांच्या उपजिविकेचे साधन निर्माण झाले आहे. कलेमध्ये पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिकाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
संस्कृती संवर्धनासाठी कलांचे योगदान किती?
- कला संवर्धनासाठी कलांचे योगदान होते आणि आजही आहे. सामाजिक प्रबोधनाबरोबरच मनोरंजनाचाही भूमिका कलांनी उत्तमपणे बजावली आहे. कलाकार हा संस्कृती पुढे नेण्याचे काम करीत असतो. स्वातंत्र्योत्तर आणि स्वांतत्र्य पूर्व काळात लोककला आणि ललित कलांनी योगदान दिले आहे. संस्कृती संवर्धनाचे काम विविध कलांनी केले आहे.
कलाविषक विद्यापीठीय शिक्षणात कोणते बदल हवेत?
-कलाविषयक अभ्यासक्रम आणि उपक्रम आता जुने झाले आहेत. ते नव्या स्वरूपात आणण्याची गरज आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा प्रात्यक्षिक, प्रशिक्षणास प्राधान्य देण्याची गरज आहे. अभिरूची बदलतीय. त्यामुळे जुने विचार, सोडून नवतेची कास धरणे गरजेचे आहे. एक ललितकला अकादमी असून चालणार नाही. विविध भागात कलाकार घडविणाऱ्या संस्था निर्माण करण्याची गरज आहे. आणि ज्या संस्था आहेत, त्यांना सरकारने पाठबळ देण्याची गरज आहे. महाराष्टÑ सरकार कलाविषयक उपक्रमांना प्राधान्य देते, ही जमेची आणि चांगली बाजू असली तरी कला आणि कलाकार घडण्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. स्वित्झरलँड सरकारने चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन दिले. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर नवनिर्मिती झाली. त्यामुळे सरकारने कलानिर्मितीसाठी प्रोत्साहन योजना सुरू करणे गरजेचे आहे.
चित्रपट कलानिर्मितीत कलादिग्दर्शकाची भूमिका किती महत्त्वाची?
-चित्रपट ही कला आहे. त्यात कलादिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची आहे. अर्थात हे दृकश्राव्य माध्यम आहे. त्यामुळे नुसती कथा चांगली असून चालत नाही. तर ती कथा वास्तववादी असणे गरजेचे आहे. कथेला जिवंत करण्याचे काम कलादिग्दर्शक करीत असतो. मात्र, त्याला दिग्दर्शकापेक्षा कमी श्रेय मिळते. हे वास्तव आणि दुर्दैव आहे. अधिक चांगल्या कलाकृती निर्माण होण्यासाठी कलाविषयक संकुचित वृत्ती बदलायला हवी. चित्रकला, शिल्पकला, नृत्य, नाट्य, चित्रपट कलांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यातून अधिकाधिक कलात्मक कलाकृ तींची निर्मिती होईल.