नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत मोठ्या वादात सापडले होते. त्यांनी उदयनराजेंवर टीका करताना शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावेच आणा असे आव्हान दिले होते. तर लोकमतच्या मुलाखतीमध्ये त्यांनी इंदिरा गांधी या गॅगस्टर करीम लाला याला भेटल्याचाही गौप्यस्फोट केला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी आज अंतर राखले. तसेच राऊत यांना मैत्राचा सल्लाही दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांच्या स्टेटमेंट पासून मी दूर आहे. मला त्या वादात पडायचं नाही. इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांनी बोलायला नको होते, हे आमचं मत आहे. त्यांनी ते मागे घेतलंय त्यामुळे वादावर पडदा पडला असल्याचे पवार म्हणाले. यानंतर अस्वस्थता निर्माण करणारं वक्तव्य करू नये, अशी सूचना करणार नसल्याचे सांगत सगळे शहाणे असल्याचेही पवार म्हणाले. तसेच सरकार 5 वर्ष चालवायचं आहे, काँग्रेस याबाबतीत व्यवहारी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी केला.
इंदिरा गांधी यांच्या करीम लालाला भेटण्याच्या वक्तव्यावर शरद पवारांनी पडदा टाकलेला असताना त्यांनी सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना अनेक लोकं भेटत असतात. त्यातील सगळेच काही माहिती नसतात, असे स्पष्टीकरणही दिले आहे. याबद्दल त्यांनी त्यांच्या एका सभेतील किस्साही सांगितला आहे. महंमदअली रोडवर माझ्या सभेत हाजी मस्तान होता असंही वादळ उठलं होतं. मात्र, त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती, असेही पवार यांनी सांगितले.
'बेळगाव पोलिसांनी मलाही मारहाण केली होती'; ठाकरे सरकारकडून व्यक्त केली एकच अपेक्षा
यानंतर सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य़ करताना मनसे आणि भाजप यांना एकत्र यावं असं वाटत असेल तर त्यांनी जरूर यावे, असे सांगितले. तसेच भाजपात गेलेल्या नेत्यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये यायचे असेल तर त्यावर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही पवारांनी सांगितले.
निर्भया प्रकरणात कायद्यात तरतूद असेल त्याप्रकारे फाशी द्यावी. जाहीर फाशी अशी काही तरतूद नाही. या प्रकरणात लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, असेही पवार म्हणाले.