मुंबई : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. पटेल यांच्यावर दबाव आणून त्याना राजीनामा देण्यास भाग पाडल्याने सरकारची आता उलटी गिनती सुरु झाल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
तसेच विजय मल्ल्या याला ब्रिटनच्या न्यायालयाने भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिल्यावरही राज यांनी ताशेरे ओढले. मल्ल्या हा भारतात असतानाच कर्जाचे पैसे देण्यास तयार होता. मात्र, त्याला फरारी घोषित करण्यात आले. त्याच्यावर देश सोडण्याची वेळ का आली, असा सवालही राज यांनी केला. उलट नीरव मोदीबद्दल सरकारने मिठाच्या गुळण्या केल्याचा आरोपही राज यांनी केला.
उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.