ठाण्यातील बड्या दहीहंडीतून गोविंदांची माघार

By admin | Published: August 31, 2015 01:39 AM2015-08-31T01:39:01+5:302015-08-31T01:39:01+5:30

मुंबईतील दहीहंडीवर फारसे निर्बंध नाहीत. ‘गोविंदांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात मात्र पोलीस वेगवेगळे नियम दाखवून हा उत्सव बंद करण्यासाठीच प्रयत्न करीत

Govind's retreat from Thane's big Dahihand | ठाण्यातील बड्या दहीहंडीतून गोविंदांची माघार

ठाण्यातील बड्या दहीहंडीतून गोविंदांची माघार

Next

ठाणे : मुंबईतील दहीहंडीवर फारसे निर्बंध नाहीत. ‘गोविंदांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात मात्र पोलीस वेगवेगळे नियम दाखवून हा उत्सव बंद करण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप ठाणे जिल्हा दहीहंडी उत्सव समन्वय समितीने केला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीविरोधात बंड करून येथील कोणत्याही बड्या दहीहंडी उत्सवात सहभागी न होण्याचा निर्णय रविवारी बैठकीत समितीने जाहीर केला. त्याऐवजी आपापल्या विभागांतील दहीहंड्या हे गोविंदा फोडणार आहेत.
दहीहंडीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच अनेक नियमांच्या बंधनामुळे तो यंदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे तो कशा प्रकारे साजरा करावा? किंवा तो साजराच करायचा की नाही? अशा संभ्रमात ठाणे आणि मुंबईतील गोविंदा मंडळे आहेत.याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा दहीहंडी उत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीसह वसई परिसरातील गोविंदा मंडळांची ठाण्यातील चंदनवाडीतील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी हा निर्णय जाहीर केला.
मुंबईत दहीहंडीचा सण निर्विघ्न साजरा व्हावा, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र ठाण्यात स्टेज, मंडप आणि डीजेबाबत वेगवेगळे नियम दाखवून ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांवर निर्बंध लादत असल्याचा आरोप पडेलकर आणि उपाध्यक्ष सुरेंद्र पांचाळ यांनी केला. गोविंदा पथकात १२ वर्षांखालील मुले नसावीत, असा आदेश न्यायालयाने दिले आहेत, त्याबाबतही पोलिसांत एकवाक्यता नाही. तसेच थरांबाबत निश्चिती नाही. असे असताना एका पोलीस ठाण्यातून थरांचे बंधन नसल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी दुसऱ्या पोलीस ठाण्यातून केवळ पाच थर रचण्याचे बंधन घातले जात आहे. या उत्सवात १८ वर्षांखालील मुलांचा सहभाग नसावा की १२ वर्षांखालील यावरूनही पोलिसांनी वेगवेगळी भूमिका आहे. ठाणे आणि वसईमध्ये मंडळांना ज्या नोटिसा पाठविण्यात आल्यात, त्यामध्ये १८, १२ तर काही ठिकाणी १४ वर्षांखालील मुलांना सहभाग घेता येणार नसल्याचे सांगितले आहे. तर थरांच्या बाबतीतही असाच संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यात उत्सवांसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा प्रश्न या वेळी करण्यात आला. मुंबईत नारळी पौर्णिमेला आठ थर लावून गोविंदांनी सराव केला. मग इथेच अटकाव का केला जातोय, असेही ते म्हणाले.

मुंबई : दहीहंडीवरून सुरू असलेल्या वादंगामुळे रविवारी वांद्रे आणि बोरीवली येथे आयोजित साहसी स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीने व समितीशी संलग्न शहरातील नामांकित गोविंदा पथकांनी घेतला होता. मात्र, रविवारी सायंकाळी ‘उपनगरचा राजा’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या जय जवान पथकाने वांद्रे येथे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत हजेरी लावली. या घडामोडीने समितीला धक्का बसला. शेलार यांनी जय जवान पथकाला स्पर्धेस येण्यास भाग पाडले, असा आरोप समन्वय समिती करते आहे. तसेच शेलार समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावाही समितीकडून होत आहे.
जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाच्या सरावाला शनिवारी रात्री शेलार उपस्थित होते. या भेटीत शेलार यांनी पथकाची मनधरणी केली आणि वांद्रे येथील स्पर्धेत सहभागी करून घेतले, अशी माहिती समितीच्या जाणत्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. जय जवानसारख्या नामांकित पथकाने शेलार यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेऊन समितीने घेतलेल्या निर्णयाला तडा दिल्याचेही हे पदाधिकारी म्हणतात. या सर्व घडामोडींमुळे गोविंदा पथकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण असून, बऱ्याच पथकांनी जय जवान गोविंदा पथकाचा निषेध नोंदवला आहे.
याबाबत ‘लोकमत’ने शेलार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Govind's retreat from Thane's big Dahihand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.