मुंबई : कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन (Omicron ) व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण झाले आहे. जगात 20 हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण असल्याची पुष्टी झाली आहे. यातच आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार अलर्ट झाले आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंट पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. यात कोरोना लसीकरण आणि उच्च जोखीम असलेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्टसंदर्भात कडक अंबलबजावणी करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे वेळोवेळी लादलेले निर्बंध सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवाशांना लागू करण्यात येतील. तसेच, दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिंबाब्वे या देशांना उच्च जोखमीचे देश म्हणून वर्गीकृत केले आहे.
याशिवाय, महाराष्ट्रात जे आंतराष्ट्रीय प्रवासी उच्च जोखीम असलेल्या देशांमधून येत आहेत आणि महाराष्ट्रात येण्यापूर्वी गेल्या 15 दिवसांत कोणत्याही उच्च जोखमीच्या देशांना भेट दिली आहे, असे प्रवासी उच्च जोखीम प्रवाशांच्या श्रेणीतील म्हणून जाहीर केले जातील. उच्च-जोखीम असलेल्या प्रवाशांना विमानतळावर प्राधान्याने उतरवले जाऊ शकते. त्यांच्या तपासणी आणि पडताळणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर संबंधित विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणांद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था केली जाईल.
अशा सर्व उच्च जोखीम असलेल्या विमान प्रवाशांना संबंधित आंतरराष्ट्रीय विमानतळावर लगेच आरटीपीसीआर टेस्ट द्यावी लागेल. तसेच, प्रवाशांना सात दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल आणि सातव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट केली जाईल. जर आरटीपीसीआर टेस्टमध्ये प्रवासी पॉझिटीव्ह आढल्यास, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल आणि कोरोनावरील उपचारांची सुविधा दिली जाईल.
याचबरोबर, सातव्या दिवशी दुसरी आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर या प्रवाशांना पुढील 7 दिवसांसाठी होम क्वारंटाईन केले जाईल. याशिवाय. देशांतर्गत विमान प्रवासाच्या बाबतीत, प्रवाशांना एकतर पूर्णपणे लसीकरण करावे लागेल किंवा प्रवास करण्यापूर्वी 72 तासांच्या आत आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्यपणे सोबत ठेवावा लागणार आहे.