राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना कांदा अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 06:47 PM2019-02-13T18:47:29+5:302019-02-13T18:50:36+5:30
राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने कांद्याचे बाजार चांगलेच पडले.
पुणे : कांद्याचे बाजार पडलेल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये प्रमाणे अनुदान देण्याचे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत राज्यातील १ लाख ६० हजार शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक ७१ हजार ४३८ तर अहमदनगर जिल्ह्यातील ४८ हजार ९११ आणि पुणे जिल्ह्यातील १२ हजार २२५ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे.
राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने कांद्याचे बाजार चांगलेच पडले. त्यामुळे राज्य शासनाने १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत कांद्याचे बाजार पडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना २०० क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. प्रथमत: ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास विलंब झाल्याने ही मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. त्यातील ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करून त्यांच्याही बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.
राज्यातील सात विभागातील १८ जिल्ह्यामधील ७७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केले होते.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लेखापरीक्षक अधिकाऱ्यांनी छाननी केली. त्यानंतर तालुका स्तरावरील समिती १ लाख ६० हजार ६९८ शेतकरी पात्र ठरविले आहेत. या शेतकऱ्यांनी ५७ लाख ४० हजार ११७ कांद्याची विक्री केली असून त्यांना ११४ कोटी ८० लाख २३ हजार ४३६ रुपये अनुदान देण्यात आले आहे.
जिल्हानिहाय कांदा अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी :-
नाशिक- ७१,४३८, धुळे-३६३६, जळगाव-१,२२३,अहमदनगर-४८,९११ , पुणे-१२,२२५, सोलापूर-८,८८३ ,कोल्हापूर-४,०५३ , सांगली-७२२ ,सातारा-१,३१७,औरंगाबाद-२,८७६, जालना-१२ , अमरावती-२३, अकोला-२६३,बुलढाणा-३६१, लातूर-३१६, उस्मानाबाद-६०८, बीड-३,७६१, नागपूर-०.