मुंबई - महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०१७-१८ चा कवी नर्मद मराठीसाहित्य पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक रत्नाकर मतकरी आणि कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार माधव रामानुज यांना घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या २४ ऑगस्ट २०१८ रोजी सायं ६.०० वाजता झवेरबेन पोपटलाल सभागृह ऑडिटोरीअम, घाटकोपर येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या अन्य पुरस्कारांमध्ये जीवनगौरव साहित्य पुरस्कार भरत नायक-गीता नायक, जीवनगौरव कला पुरस्कार प्रवीण सोलंकी, जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार केतन मिस्त्री, जीवनगौरव संस्था पुरस्कार सोलापूर गुजराती मित्रमंडळ यांना घोषित करण्यात आला असून, शुक्रवारी होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. या पुरस्कार सोहळ्यास सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार किरीट सोमैया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.
गुजराती साहित्य अकादमीतर्फे यावर्षी १४ पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये २ कवी नर्मद, ४ जीवनगौरव, ८ वाङ्मय पुरस्कार यांचा समावेश आहे. सर्व पुरस्कारार्थींना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच अन्य ८ वाङ्मय पुरस्कारांमध्ये चुनीलाल मडिया प्रथम पुरस्कार प्रेरणा के. लीमडी, चुनीलाल मडिया व्दितीय पुरस्कार श्रीमती दीक्षित, रामनारायण पाठक प्रथम पुरस्कार इला आरब मेहता, रामनारायण पाठक व्दितीय पुरस्कार प्रफुल शाह, हरिश्चंद्र भट्ट व्दितीय पुरस्कार सतिश व्यास, वाडीलाल डगली प्रथम पुरस्कार प्रो. हितेश पंडया, गोपाळराव विद्वांस प्रथम पुरस्कार श्रीमती उर्वशी पंड्या, गोपाळराव विद्वांस व्दितीय पुरस्कार श्रीमती नीला रोठाड यांना देण्यात येणार आहे.