ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १२ : महेश कोटीवाले दत्तसंप्रदायातील अत्यंत पूजनीय असलेल्या गुरुचरित्र या ग्रंथातील ७५०० ओव्यांचे गायन आणि संगीतबद्ध करण्याची सेवा येथील युवा गायक ज्ञानेश्वर वाघमारे यांनी बजावली आहे. त्यांच्या या कामगिरीकडे गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड चेही लक्ष वेधण्यात आले असून, यासंदर्भातील पाहणी लवकरच होणार आहे.
ज्ञानेश्वर वाघमारे हे भाड्याच्या घरात राहून पत्नी सारिकाच्या सहकार्याने संगीताची आराधना करीत आहेत. तेथेच त्यांची रेकॉर्डिंग रुमही आहे. श्री दत्तात्रयाचे निस्सीम भक्त असलेले वाघमारे बारावीपर्यंत शिकले आहेत; पण संगीतामध्ये ते पारंगत आहेत. सूरश्री कार्यकर्ते, आशा खांडेकर, आण्णा सुरवसे आणि डॉ. हेरंबराज पाठक यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले आहे. आजवर त्यांनी भजनसम्राट अनुप जलोटा, अनुराधा पौडवाल यांच्यासमवेत गायन केले आहे.
ज्ञानेश्वर म्हणाले की, गुरुचरित्राच्या ध्वनीमुद्रणासाठी गिरीश खेड यांनी संगणक भेट दिला. त्यानंतरच या सेवेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. यापूर्वी स्वामी चरित्र सारामृत हा तीन हजार ओव्यांचा ग्रंथही संगीतबद्ध केला आहे. गुरुकृपेने ही सेवा यशस्वी झाल्यानंतर गुरुचरित्राचे संगीतकार्य हाती घेतले. गुरुचरित्रामध्ये ५३ अध्याय असून, त्यातील ७५०० ओव्या संगीतबध्द करण्यासाठी साडेतीन महिन्यांचा कालावधी लागला. या ओव्या तीन सीडीज्मध्ये रेकॉर्ड करण्यात आल्या आहेत. त्या ऐकण्यासाठी २८ तास लागतात. या संगीत सेवेत वाघमारे यांना बाबुराव भोसले, नरेश क्षीरसागर, मनोज खेडलकर, चंद्रशेखर मुळे यांनी वाद्यांची साथसंगत केली आहे.