गुरुतुल्य - पुष्पाबाई भावे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 11:59 PM2020-10-03T23:59:20+5:302020-10-03T23:59:33+5:30
अनेक विद्यार्थ्यांना साहित्य आणि समाज या विषयाचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना समाजाचा बहुअंगी विचार करायला भाग पाडले. पण केवळ विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका अशी त्यांची ओळख करून देणे हे त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारे ठरेल.
पुष्पाबाई भावे हे नाव घेताच आदरयुक्त स्नेहाची भावना मनात उचंबळून येते. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात जी मन्वंतर घडून आली त्यात केवळ वैचारिकच नव्हे, तर आपल्या कृतीने सहभागी झालेल्या मोजक्या धुरिणींमध्ये पुष्पाबाई भावे यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्या पिढीने आपल्या वैचारिक सामर्थ्याने समाजवादी राष्ट्राच्या विकासासाठी आपले योगदान दिले त्या पिढीचे नेतृत्व पुष्पाबार्इंनी केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून संस्कृत आणि मराठी विषयातून एम.ए.ची पदवी संपादन करून मुंबईतील सिडनहॅम, डहाणूकर, दयानंद, चिनॉय आणि दीर्घकाळ रुईया महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्ययन करणाऱ्या पुष्पाबार्इंनी शिक्षक म्हणून आपला ठसा उमटवला. अनेक विद्यार्थ्यांना साहित्य आणि समाज या विषयाचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना समाजाचा बहुअंगी विचार करायला भाग पाडले. पण केवळ विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका अशी त्यांची ओळख करून देणे हे त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारे ठरेल.
नाटक, चित्रपट या कलांचा सखोल अभ्यास करून त्या कलाकृतींची सापेक्षी समीक्षा करणाºया कलासक्त पुष्पाबाई, मृणाल गोरे यांच्या आणीबाणीतील लढा तसेच मराठवाडा विद्यापीठातील नामांतर आंदोलन, यात आपले सक्रिय सहभाग देणाºया पुष्पाबाई किंवा शेजारधर्म म्हणून रमेश किणी खून प्रकरणात त्याच्या पत्नीच्या कायदेशीर लढाईत शेवटपर्यंत साथ देणाºया कणखर पुष्पाबाई, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे वेगवेगळे पैलू आपल्याला केवळ अचंबित करत नाहीत, तर विपरीत परिस्थितीत पाय रोवून उभे राहण्याचे बळही देतात.
ज्या समाजात आपण राहतो त्यातील शोषितांच्या व्यथांचा संवेदनशीलपणे विचार करून त्यासाठी उपाययोजना करणाºया गटाला आपल्या वैचारिक अधिष्ठानाने झळाळी देण्याचे आणि त्यांच्या कामाला आपल्या सहभागाने प्रोत्साहन देण्याचे काम पुष्पाबार्इंनी अखंडपणे केले. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समिती, नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. लागू, निळू फुले यांनी सुरू केलेला सामाजिक कृतज्ञतानिधी, या सार्वजनिक उपक्रमामध्ये पुष्पाबार्इंनी हिरिरीने सहभाग घेतला. भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी उपक्रमाअंतर्गत पाकिस्तानमधील शहरातील सामान्य लोकांच्या वस्तीत जाऊन सहृदयतेचे नाते त्यांनी प्रस्थापित केले.
प्रभात चित्र मंडळामुळे ज्या अलौकिक व्यक्तिमत्त्वांचा स्नेह मला मिळाला त्यापैकी पुष्पाबाई आणि अनंत भावे हे एक विलक्षण लोभस दांपत्य! लहानपणी मुंबई दूरदर्शनवर साडेसातला आपल्या धीरगंभीर आवाजात बातम्या देणारे म्हणून स्मरणात असलेले अनंत भावे आणि विविध आंदोलने, सभा यातून आपली परखड मते मांडणाºया, प्रसंगी शासनकर्त्यांना त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल जाब विचारणाºया पुष्पाबाई जागतिक चित्रपटांच्या खेळाला, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहात असते. त्या चित्रपटावर चर्चा करत, त्यातील एखादे अंतसूत्र उकलून सांगत. अफाट वाचन, त्यावरील तर्कसंगत मांडणी या त्यांच्या गुणामुळे एखाद्या पुस्तकावरील त्याचे विश्लेषण ऐकणे म्हणजे पर्वणीच असायची. एखाद्या पुस्तक प्रकाशनाला त्यांना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावले तरी त्या पुस्तकातील आवडलेल्या बाजूंच्या बरोबरीनेच न पटलेल्या मुद्द्यावर पुष्पाबाई रोखठोक बोलायच्या. पण त्यांच्या या रोखठोकपणात विखार नसे. लेखकाला पुष्पाबार्इंनी केलेल्या निरीक्षणाचा नक्कीच फायदा होत असे. बार्इंनी पुस्तकावर मारलेल्या लाल खुणा लेखकाला भूषणास्पद वाटायच्या.
साहित्य असो वा नाटक किंवा आसपास घडलेली एखादी घटना, पुष्पाबाई त्यावर आपल्या विलक्षण बुद्धीने प्रतिक्रिया देत. मोजकेच पण थेट बोलणे हा त्यांचा स्वभावविशेष! त्यावर होणाºया टीकेला, मानहानीला आणि प्रसंगी हल्ल्याला प्रतिकार करण्याचे बळ त्यांच्या ठायी होते. ही निर्भीडता त्यांनी आपल्या ध्येयवादी जीवनशैलीतून कमावली होती. साधी सुती साडी नेसणाºया पुष्पाबार्इंच्या चेहºयावर विद्वत्तेचे आणि निर्भीडतेचे तेज नेहमी झळाळत असायचे.
कोणत्याही राजकीय प्रलोभनापासून आणि वैयक्तिक स्वार्थापासून अलिप्त असलेली पुष्पाबार्इंसारखी गुरुतुल्य माणसे समाजात असणे ही त्या समाजाची घडी व्यवस्थित राहण्यासाठी गरजेचे असते. ही माणसे त्यांच्या केवळ अस्तित्वातून इतरांना लढण्यासाठी बळ देत असतात. पुष्पाबार्इंच्या मृत्यूनंतर औपचारिक श्रद्धांजली वाहण्याऐवजी त्यांच्यातील धैर्याचा काही अंश आपल्याठायी कायमचा वसावा यासाठी प्रार्थना करू या.
- संतोष पाठारे
सचिव, प्रभात चित्र मंडळ