मुंबई : मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि हार्बर प्रवाशांचे हाल काही संपता संपत नसल्याचे सोमवारी दिसून आले. मालवाहतुकीचे तीन डबे आणि त्याला जोडलेली एक ब्रॅक व्हॅन घसरल्याची घटना पहाटे ४.0९ च्या सुमारास वडाळ््याजवळील रावळी जंक्शन येथे घडली. या घटनेत हार्बर मार्ग पूर्ववत होण्यास तब्बल १६ तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे कामाच्या पहिल्याच दिवशी हार्बरवासीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे १८८ हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरून मुख्य मार्गावर येणाऱ्या मालगाड्या वडाळा येथील रावळी जंक्शन येथून हार्बर मार्गात प्रवेश करतात. सोमवारी पहाटे ४.0९ च्या सुमारास मसुराची डाळ भरलेली ४३ डब्यांची असलेली मालवाहतूक गाडी येथून जात होती. ही गाडी जात असतानाच त्याचे तीन डबे आणि एक बॅ्रक व्हॅन घसरली. मात्र, ही घटना एवढी मोठी होती की, रूळही उखडले, तर ओव्हरहेड वायरही तुटल्या. त्यामुळे हार्बवरील अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. त्याचा पहिला मोठा परिणाम सीएसटी ते कुर्ला या वाहतुकीवर झाला. घटनेची माहिती मिळताच तत्काळ रेल्वेच्या परिचालन व अभियंता विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, रुळांची आणि ओव्हरहेड वायरची असलेली अवस्था, तसेच डबे मसुराच्या डाळीने भरलेले असल्याने, काम पूर्ण होण्यास बराच अवधी लागणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे आधी डबे रिकामी करण्याचे काम हाती घेण्यात आले आणि त्यानंतर, अन्य कामांना सुरुवात करण्यात आली. हे काम होण्यास बराच वेळ लागत असल्याने हार्बरचा बोऱ्या वाजला. सीएसटी ते कुर्ला दरम्यान वाहतूक ठप्प झाल्याने, रेल्वेने कुर्ला ते वाशी, बेलापूर, पनवेल व सीएसटी ते वांद्रे, अंधेरीपर्यंत फेऱ्या सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. यात काही विशेष फेऱ्याही चालवण्यात आल्या, परंतु त्याचा फारसा परिणाम काही झाला नाही. अर्धा ते एक तास लोकल उशिराने धावत असल्याने, प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला. उशिराने धावत असलेल्या लोकल यामुळे स्थानकांवर एकच गर्दी उसळली. काही स्थानकांवर तर उद्घोषणाही होत नसल्याने, प्रवाशांना नेमके काय झाले याची माहितीही मिळत नव्हती. त्यामुळे स्टेशन मास्तर आणि रेल्वे पोलिसांकडे प्रवासी विचारणा करत होते. सकाळी ४.0९ च्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर डाउन हार्बर पूर्ववत होण्यास तब्बल १६ तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांनाही चांगलीच कसरत करावी लागली. रात्री उशिरापर्यंत हार्बरवासीयांचे हाल सुरूच होते. या घटनेमुळे जवळपास १८८ हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. घटनास्थळामधून सीएसटीला जाणारी (अप)पहिली लोकल ही रात्री ८.0७ च्या सुमारास धावली. त्यानंतर, रात्री पावणे नऊच्या सुमारास डाउन मार्गावरून पहिली लोकल धावली. >रुळाला तडा गेल्याने घटना?रेल्वे रुळाला तडा गेल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले जाते. मात्र, या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून, त्यासाठी समितीही नेमण्यात आली आहे. चौकशीनंतरच घटनेचे नेमके कारण समोर येईल, तसेच रेल्वे पोलिसांकडून यात अन्य काही कारण तर नाही ना, याचा शोध घेतला जात आहे.सीएसटी-अंधेरी आणि कुर्ला, पनवेल-वाशी ते ठाणे आणि कुर्ला-पनवेल या दरम्यान सहा अतिरिक्त लोकल चालवण्यात आल्या. संपूर्ण दिवसभरात १४२ विशेष फेऱ्या रेल्वेने चालवल्या.रेल्वेकडून बेस्ट प्रशासनालाही जादा बसेस चालवण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार, चार जादा बसेस कुर्ला ते वडाळा आणि दोन बसेस ट्रॉम्बेसाठी चालवण्यात आल्या. दुपारी दोन वाजेपर्यंत ६४ विशेष सेवा बेस्टने चालवल्या.
हार्बरवासीयांचे तब्बल १६ तास हाल
By admin | Published: February 28, 2017 5:19 AM