मुंबई : नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीवरून मुस्लिमांनी ठिकठिकाणी आंदोलने छेडली होती. तसेच देशभरात झालेल्या विविध ठिकाणच्या आंदोलनांमध्ये विद्यार्थ्यांसह अन्य संघटनांनीही सहभाग घेतला होता. या आंदोलनांना हिंसक वळणही लागले होते. महाराष्ट्रात हा कायदा लागू करणार नसल्याची भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काल मुस्लिम संघटनांचे शिष्टमंडळ जाऊन भेटले.
राज्यात एनआरसी काय़दा लागू करू नये, या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना पंतप्रधानांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्यावर पंतप्रधान म्हणून विश्वास ठेवूयात, त्यांनी देशभरात एनआरसी कायदा लागू होणार नसल्याचे म्हटले आहे. देश म्हणून आपण एक रहायला हवे. असे न केल्यास त्याचे देशाला परिणाम भोगावे लागतील, असा सल्ला त्यांनी आझमी यांना दिला.
शिवसेनेचा मूळ मुद्दा हिंदुत्व आहे आणि राहील. परंतू मी किमान समान कार्यक्रमांतर्गत काम करणार आहे. पंतप्रधानांनी एनआरसी लागू न करण्याचे सांगितले त्यावर विश्वास ठेवावा लागेल. परंतू महाराष्ट्रात कोणाला त्रास व्हायला देणार नाही, असे आश्वासन दिल्याचे अबू आझमी यांनी सांगितले.
शिवसेनेची भूमिका काय?
शिवसेनेने लोकसभेत या कायद्याला पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत या कायद्याच्या मतदानावेळी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिवसेनेची नागरिकत्व कायद्याबाबत नक्की भूमिका काय आहे हे स्पष्ट झाले होते. त्यातच आता नागरिकत्व कायद्याला शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी समर्थन केलं असल्याचे समोर आले आहे.