नाशिकमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 02:46 PM2021-03-30T14:46:52+5:302021-03-30T14:47:10+5:30
श्रमिकनगर माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार ( 52) यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
नाशिक :- जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीचा मंगळवारी (दि.30) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समजताच हा धक्का पचवू न शकल्याने सकाळी पतीनेही राहत्या घरी गळफास घेत मृत्युला कवटाळले. ही धक्कादायक घटना नाशिकमधील सातपुर भागातील श्रमीकनगर वसाहतीत घडली. या घटनेने संपुर्ण शहर हादरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
श्रमिकनगर माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार ( 52) यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा आणि मुलगी देखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयातच आईजवळ थांबलेले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता पवार यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.
मातृछत्र हरपल्याने या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोघांनी रुग्णालयातच टाहो फोडला. पवार यांच्या मुलाने स्वतः ला सावरत वडिलांना मोबाईल वर संपर्क करुन ही दुःखद वार्ता कळविली.
बराच वेळ होऊनही वडील रुग्णालयात म पोहोचल्याने मुलाने पुन्हा वडिलांना वारंवार फोन केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने मुलाने शेजारच्या कुटुंबियांना फोन करुन वडिलांची माहिती घेण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी रवींद्र पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता पवार यांनी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी त्वरित ही माहिती मुलाला कळविली. यावेळी एकाचवेळी मातृ-पितृ छत्र नियतीने हिरावून घेतल्याने या भाऊ बहिणींच्या अश्रुंचा बांध फुटला. दोघेही एकमेकांना धीर देत ढसाढसा रडत होते यावेळी रुग्णालयातील अन्य नागरिकांनी त्यांच्याजवळ जात समजावून धीर देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आहे.याबाबत भाजपा सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकीत जाऊन घटनेची प्राथमिक माहिती दिली.सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मध्यमवर्गीय सामान्य कुटुंब
मयत रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसहतीतील एका कंपनीत ठेकेदारीवर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु गेल्या वर्षभरापासून ते घरीच राहत असल्याचे सांगण्यात आले. मयत पवार दाम्पत्याच्या पश्चात मोठा मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मुलगा हादेखील रोजंदारीवर एका खासगी कारखान्यात कामाला जातो. पवार यांचे अत्यंत सामान्य गरीब कुटुंब होते. या कुटुंबाचा आधारच आता नियतीने हिरावून घेतल्याने भावंडांवर आकाश फाटले आहे.