‘त्यांनी’ सोडलं गाव कामासाठी : ‘यांनी’ शोधलं पोटापाण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:51 PM2019-05-13T12:51:11+5:302019-05-13T12:54:49+5:30
स्थलांतरितांच्या गावात विहिरी खोदून कर्नाटकातील कुटुंब भरताहेत पोट
एल. डी. वाघमोडे
माळशिरस : तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील शेतमजूर तात्पुरते दुसरीकडे स्थलांतरित झाले आहेत़ शेतकरी पाण्याच्या शोधात विहिरींची खोदाई करून शेतीची व स्वत:ची तहान भागविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काहींनी गाव सोडलं असलं तरी याच स्थलांतरितांच्या गावामध्ये पोटापाण्याच्या शोधासाठी कर्नाटकातून आलेल्या अनेक कुटुंबांनी कामातून आधार शोधला आहे.
दिवाळी संपताच कर्नाटकातील ही कुटुंबं पाण्याचे स्रोत असणाºया भागांमध्ये भ्रमंती सुरू करतात. शहराच्या बाजूला मैदानामध्ये हे उतरतात़ आपण विहिरी खोदायचे काम करत असल्याचे फलक लावून जाहिरात करतात़ त्यानुसार आसपासचे शेतकरी त्यांना येऊन भेटतात़ शेतकरी आणि त्यांच्यात करार होतो़ त्यानंतर हे कुटुंब प्रत्यक्ष विहीर खोदायच्या कामाला सुरुवात करते़ सुरेश राठोड यांचे कुटुंब कुडगीतांडा (ता. बसवनबागेवाडी, जि़ विजयपूर) माळशिरस तालुक्यात दाखल झाले आहे़ त्यांची पत्नी कांताबाई, पाचवीतून शाळा सोडून आलेली १४ वर्षांची मुलगी आक्रोना तर सहावीतून शाळा सोडून आलेला चंद्रशेखर हा मुलगा, भाऊ महादेव राठोड, त्याची पत्नी शारूबाई राठोड आणि त्यांची दोन लहान मुले असे हे कुटुंब सध्या भांबुर्डी परिसरात विहीर खोदायचे काम करीत आहे.
यातील महिला कांताबाई स्वत: क्रेन चालवतात तर त्यांची मुले क्रेन बाजूला ढकलणे आणि विहिरीत खोदलेले दगडगोटे वर भराव्यावर व्यवस्थित ठेवण्याचे काम करतात़ दिवाळीपासून जून महिन्यापर्यंत या परिसरात १० ते १५ विहिरींची खोदाई करतात.
असा होतो करार
- प्रथमत: विहिरीची पाहणी करतात, त्यानंतर त्या विहिरीतील खडकांच्या थराचा अंदाज घेऊन विहिरीची लांबी व रुंदी यानुसार प्रति फुटाला आठ ते दहा हजार रक्कम घेण्याचा करार केला जातो़ यामध्ये काम सुरू असताना विहिरीत येणारे पाणी विहिरीबाहेर टाकणे आवश्यकता असल्यास खडकांना ब्लास्टिंगच्या साह्याने फोडणे आदी गोष्टींचा समावेश असतो़ यात कुटुंबातील प्रत्येक महिला क्रेन अगदी सफाईने चालवतात तर पुरुष मंडळी विहिरीतील दगडगोटे भरून क्रेनद्वारे वर पाठवतात.
व्यवसाय म्हणून आम्ही क्रेनद्वारे विहिरी खोदायचं काम करतो़ पूर्ण हंगामात आठ ते दहा लाखांपर्यंत पैसे मिळतात, मात्र त्यामधून खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत नफा आम्हाला मिळतो़ त्यानंतर पाऊस पडला की गावाकडे जाऊन शेतीतील कामांना सुरुवात करतो़
- सुरेश राठोड, कुटुंबप्रमुख, कर्नाटक
सध्या विहिरीची खोदाई सुरू केली आहे़ किमान पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल व भविष्यात पाऊस पडल्यानंतर शेतीला या पाण्याचा चांगला उपयोग होईल़ या हेतूने खोदाई केली जात आहे.
- दत्तात्रय नरळे, शेतकरी, भांबुर्डी