मिल्खासिंगना भेटण्यासाठी त्याने पटकाविले ‘पदक’
By admin | Published: April 2, 2015 01:14 AM2015-04-02T01:14:46+5:302015-04-02T01:26:15+5:30
ओंकार राणेची जिद्द : स्पेशल आॅलिम्पिकमध्ये मिळविली दोन पदके
कोल्हापूर : एखाद्याच्या मनात दृढ इच्छाशक्ती असेल, तर ती कशी पुरी होते, याचा प्रत्यय कोल्हापुरातील मंगेशकरनगर येथील ओंकार राणे याला आला. ओंकारने न्यू कॅसलमध्ये झालेल्या स्पेशल आॅलिम्पिकमध्ये १०० मीटर धावणे प्रकारात रौप्यपदक, तर गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकाविले आणि त्याची मिल्खासिंग यांची भेट घेण्याची इच्छा पूर्ण झाली.
चेतना विकास मंदिरमधील ओंकारची न्यू कॅसलमध्ये झालेल्या स्पेशल आॅलिम्पिकसाठी निवड झाली होती. या स्पर्धेसाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे वडील किरण व आई संगीता यांनी त्याला निरनिराळ्या स्पर्धांवर आधारित चित्रपट दाखविले. यामध्ये ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपटही होता. हा चित्रपट त्याला इतका आवडला की, तो वेळ मिळेल तेव्हा हाच चित्रपट पाहत होता. चित्रपट पाहून तो मिल्खासिंग यांच्यासारखा धावण्याचा सराव करू लागला.
नेहमी मिल्खासिंगबाबत तो आईवडिलांकडे चौकशी करू लागला. यावेळी त्यांच्या आईवडिलांनी ‘तू जर या स्पर्धेत पदक पटकावलेस तर तुझी मिल्खासिंगसोबत भेट घडवून आणून देण्यात येईल,’ असा शब्द दिला. या एका शब्दावर त्याने या स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत दोन पदके पटकाविली. घरी आल्यानंतर त्याने सतत मिल्खासिंगला कधी भेटविणार, असा तगादा लावला. आता भेट कशी घडवायची, असा प्रश्न राणे कुटुंबीयांना पडलेला असताना, योगायोगाने ‘आकाशवाणी’वर ‘जागरूक पालक’ या सदरात ओंकारच्या आईवडिलांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी ओंकारचा हा किस्सा त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितला. मुलाखत ऐकून कोल्हापुरातील बुरांडे यांनी मिल्खासिंग यांच्या पत्नीचा मोबाईल नंबर राणे कुटुंबीयांना मिळवून दिला. ओंकारच्या आईनी त्यांच्याशी संपर्क साधून, सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी चंदिगड येथे भेटण्याचे आमंत्रणही दिले.
२६ फेब्रुवारी रोजी मिल्खासिंग यांच्या चंदिगडच्या घरी आम्ही भेटण्यासाठी गेलो. यावेळी मिल्खासिंग यांनी सुद्धा आपुलकीने त्यांचे कौतुक करून घरामध्ये जेवण देऊन दोन-तीन तास मनसोक्त गप्पा मारून त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.
ओंकार, तू देश का बेटा...
ओंकारची जेव्हा त्याच्या आईवडिलांसोबत मिल्खासिंग यांच्या घरी भेट झाली, तेव्हा मिल्खासिंग यांनी ‘ओंकार, तू सिर्फ किसी गाव का बेटा नहीं, अब तू देश का बेटा है। तुझे और भी पदक जितने हैं।’ अशा शब्दांत त्याचे कौतुक केले, तेव्हा ओंकारच्या आईवडिलांच्या डोळ्यांत पाणी आले.
मी व ओंकारचे वडील आम्ही दोघेच त्याचा रोज टेनिस, धावण्याच्या सराव करून घेत होतो. मी घरातील काम करीत असताना त्याच्याकडून दोरी उड्या घेत होते. मात्र, ओंकारची व मिल्खासिंग यांची भेट होईल, असे कधीच वाटत नव्हते. मात्र, देवाच्या कृपेने ती भेट घडून आली.
- संगीता राणे
(ओंकारची आई)