लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढविले आहे. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार का?, असा सवाल उपस्थित होत असताना सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या डॉक्टरांना ३१ मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. येत्या काळात नव्या पिढीला संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला.
लोकमत वेलनेस मेन्टॉर पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना टोपे यांनी सांगितले, की यापूर्वी आरोग्य विभागातील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. कारण, त्यावेळी त्यांच्या अनुभवाची गरज होती. याचा विचार करून या अधिकाऱ्यांना मुदतवाढीसाठी ग्राह्य धरण्यात आले होते. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची सबब देऊन चालणार नाही.
नव्या पिढीला संधी
सरकारविरोधात अवमान याचिका दाखल झाली आहे. सरकारने नवीन भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या अधिकाऱ्यांची जागा नवीन पिढी घेईल. नव्याने घडणारे अधिकारी, तसेच कित्येक वर्षे पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करणारे अधिकारी आहेत. त्यामुळे या सर्वांना संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.