मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. यामुळे पुढील आठवडाभरात ११-१७ ऑक्टोबर, महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस सक्रीय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्य़ात आली असून याचा कापणीला आलेल्या पिकांना धोका आहे.
आधी रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ११ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १२ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. १३ ऑक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. १४ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय समुद्र खवळलेला राहील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
मुंबईत दिवसा झाली रात्रमुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी दुपारसह सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. दुपारी काही काळ पडलेल्या उन्हानंतर मुंबईला वेढलेल्या ढगांनी एवढा काळोख केला की, दिवसाच रात्र झाल्याचा भास मुंबईकरांना झाला. दुपारी दाटून आलेला काळोख सायंकाळ झाली तरी कायमच राहिला. सायंकाळपर्यंत ढग कायम होते, मात्र पाऊस कमी झाला. संध्याकाळी सातनंतर वातावरण बऱ्यापैकी निवळले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होत आहेत. १४ आॅक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्यात पाऊससदृश्य परिस्थिती असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पाऊस आणखी पाच दिवस मुक्कामीसक्रिय हवामानाच्या परिस्थितीमुळे मान्सूनच्या परतीचा प्रवास ६ आॅक्टोबरपासून पुढे सरकला नाही. राज्यात आणखी पुढील पाच दिवस पावसाचा मुक्काम राहील. ११ आणि १२ आॅक्टोबर रोजी मेघगर्जनेसह पाऊस कोसळले. - कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग