Maharashtra Weather Forecast ( Marathi News ) : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच प्रादेशिक हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी पावसाबाबतचा अंदाज वर्तवला असून राजधानी मुंबईत हलका ते मध्यम पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. "पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे," अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तसंच मुंबई शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ अंश सेल्सिअस आणि २७ अंश सेल्सिअसच्या आसपास असणार आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कुठे किती बरसला?
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात नरखेड आणि बार्शी तालुक्यात पडलेल्या विजांच्या कडकडाटासह झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. परिणामत: नरखेड परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पिकांमध्ये, शेतात सर्वत्र पाणी साठून तळ्याचे रूप आले आहे.
सातारा जिल्ह्यात मान्सूनने आनंद आणला असून सर्वदूर पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील टंचाईची दाहकता कमी झाली आहे. मागील आठवड्यापासून तब्बल ७७ गावे आणि २६३ वाड्यांतील ६० टॅंकर बंद झाले आहेत. जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक पडला आहे.
लातूर जिल्ह्यात मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लोणावळा शहरामध्ये मंगळवारी जोरदार पाऊस झाला. ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट करत जोरदार पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत झाला. या चार तासात लोणावळा शहरात तब्बल १०६ मिलिमीटर (४.१७ इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे.