पुणे : जवळपास पन्नास टक्के चित्रपट हे पोलिसांवर निघतात. प्रत्येक क्षेत्रात चांगले वाईट लोक आहेत. पुरंतु, सातत्याने फक्त वाईटावर बोट ठेवले जाते. पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. पण हिंदी सिनेमावाल्यांनी पोलिसांची इमेज खराब केली, अशाप्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिंदी सिनेमासृष्टीला लक्ष्य केले. पुण्यात महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारणी सभा पुणे यांच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी देशमुख बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उध्दव कानडे , कार्याध्यक्ष सचिन ईटकर, महेंद्र रोकडे, रवींद्र डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते. देशमुख म्हणाले, पोलीस खाते जास्तीत जास्त मॉर्डन करण्यावर भर देणार आहे. 8 हजार नवीन पोलिसांची भरती होणार आहे. येत्या चार महिन्यात ती भरती करण्यात येईल. महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे जे रक्षक आहे त्यात देखिल 7 हजार नवीन सुरक्षा रक्षक पदांची भरती घेणार आहे.
तसेच कुणी पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याची सोय कशी लावायची हे आम्ही ठरवू ? पोलिसांचा दरारा कायम राहिला पाहिजे. महिलांच्या संस्थांना समन्वय करण्याबद्दल देशमुख म्हणाले, राज्यात अनेक सामाजिक संस्था काम करतात.महिला संघटना यांना पोलीस संघटना यांच्याशी कसे जोडून घेता येईल याचा विचार करणार आहे.