भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद - एन. डी. पाटील
By admin | Published: February 22, 2016 02:09 AM2016-02-22T02:09:16+5:302016-02-22T02:09:16+5:30
अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी
कोल्हापूर : अपघाताने सत्तेवर आलेल्या भाजपामुळे हिंदू धर्मवाद्यांचा उन्माद वाढला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी रविवारी केला. सांप्रदायिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातनी, अविवेकी शक्तीच्या विरोधात आक्रमकपणे लढत राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी भविष्यात पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, माजी कुलगुरू राम ताकवले, डॉ. हमीद दाभोलकर, ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. पाटील म्हणाले, केवळ हिंदू राष्ट्र बनविण्याचा विचार असलेली शक्ती मोदी पंतप्रधान झाल्यानंतर फोफावली आहे. धर्मनिरपेक्षतेची कवचकुंडल असलेल्या राज्यघटनेवर गदा आणण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या होत आहे. धर्माच्या नावावर एकोपा धोक्यात आणली जात आहे. मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया, ‘स्टार्ट अप’च्या गोंडस नावाखाली विषमतेची दरी रूंदावत आहे.
देशात केवळ हिंदूंनाच महत्त्व देण्याची भाजपची नीती सर्वसामान्य हिंदूंना पटलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर देशात भाजपाच्या मतांची टक्केवारी घटते आहे, असे ते म्हणाले.
सती प्रथा, बालविवाह, विद्वान दुय्यम वागणूक असलेल्या हिंदू धर्माचा अभिमान बाळगण्यात काय आहे, असा सवालही प्रा. एन. डी. पाटील यांनी या वेळी उपस्थित केला. आता कारे म्हटल्यानंतर सौम्य भाषेत उत्तर देणे परवडणारे नसून आक्रमकपणे त्याच भाषेत उत्तर देणे उचित होईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात : राज्यकर्त्यांच्या सुलतानी संकटामुळे १९९५ ते २०१५पर्यंत राज्यातील ३ लाख १७ हजार शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करून अपमानित जीवनाचा अंत केला. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. इंग्रजांच्या विरोधात लढताना व दुसऱ्या महायुद्धातही इतक्या लोकांचा मृत्यू झाला नव्हता. शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर राज्यकर्ते भेकड सल्ला देत आहे, हे संतापजनक आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.