पुणे : जिल्हा विकास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या जिल्हा व्यसनमुक्ती चळवळीला जिल्हा परिषद प्रशासनाने मदतीचा हात देत सुमारे १३00 ग्रामपंचायतींत १५ आॅगस्टला व्यसनमुक्तीचे ऐतिहासिक ठराव केले. राज्यात असे ठराव करणारी पुणे जिल्हा परिषद ही एकमेव आहे. त्यामुळे ६0 ते ७0 टक्के अवैध धंदे बंद होण्यास मदत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या पुढाकाराने जिल्हा विकास यंत्रणेमार्फत स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत (दारूबंदी) प्रबोधन व प्रचार ही नावीन्यपूर्ण योजना गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढण्यासाठी व्यसनाधीनता अडसर ठरते. त्यामुळे प्रबोधन व मार्गदर्शनातून व्यसनांंपासून दूर करणे हे काम सुरू आहे. यासाठी जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील २0 अशा १२0 महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. प्रत्येक तालुक्यात कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या चांगल्या उपक्रमाला मदतीचा हात देत जिल्हा परिषद प्रशासनाने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीत ठराव घेऊन १५ आॅगस्टला प्रत्येक ग्रामपंचायतीने हद्दीत अवैध दारूविक्री बंद करणेबाबत ठराव घेण्याचे आदेश दिले. आमच्या गावात अवैध दारू/ हातभट्टी मुबलक प्रमाणात मिळते. ती प्यायल्यामुळे आमची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांचे संसार देशोधडीस लागत आहेत. म्हणून आमच्या गावात विनापरवाना दारूविक्रीस प्रतिबंध करण्यात यावा. तसेच आमच्या शाळा संपूर्णपणे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणेस कोटपा कायदा २००३ अन्वये गुन्हा आहे. तोदेखील तत्काळ बंद व्हावा, आम्ही आजपासून मिसरीदेखील वापरणार नाही, असा ठराव घेण्यात आला. जिल्ह्यातील १४0७ ग्रामपंचायतींपैैकी सुमारे १३00 ग्रामपंचायतींनी हा ठराव केल्याचे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे ठराव, त्याच्या भागातील ठाणे अंमलदार यांना देण्यात आले असून, त्याची प्रत तहसीलदार आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)>गावागावांत प्रबोधन : एक लाख सह्यांची मोहीम सुरूव्यसनांमुळे कित्येक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे जनजागृतीची सध्या मोठी गरज आहे. जिल्हा विकास यंत्रणेमार्फत हे काम सुरू असून, जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी आम्ही १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ठराव केले आहेत. हे ठराव एकत्रित करून राज्यशासनाला पाठविणार असून, याबाबत धोरणात्मक बदल करण्याची मागणीही करणार आहोत.- प्रदीप कंदअध्यक्ष, जिल्हा परिषद
व्यसनमुक्तीचे ऐतिहासिक ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2016 12:55 AM