जीआरपीकडून होमगार्डच्या हजेरीची तपासणी
By admin | Published: November 3, 2016 05:26 AM2016-11-03T05:26:00+5:302016-11-03T05:26:00+5:30
लोकलमधून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या उपस्थितीची आता कसून तपासणी केली जाणार आहे
मुंबई : लोकलमधून रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तासाठी नेमण्यात येणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांच्या उपस्थितीची आता कसून तपासणी केली जाणार आहे. संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी असेल, असे रेल्वे आयुक्तांकडून सांगण्यात आले.
जीआरपीमध्ये बंदोबस्तासाठी नेमलेल्या होमगार्डच्या हजेरीबाबत मोठा गैरव्यवहार झाला आहे. २०१४ च्या जानेवारी महिन्यात जवानांची खोटी हजेरी व देयके दाखवून भत्ता उकळण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्याबाबतचे वृत ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर जीआरपी पोलीस व होमगार्डच्या वर्तुळात खळबळ उडाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडाळा रेल्वे स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी यासंबंधी सर्व कागदपत्रे पुन्हा जमविले. संबंधित होमगार्डचे जबाब नोंदविले आहेत. त्यात सहभागी असणाऱ्या अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत रेल्वेचे आयुक्त निकेत कौशिक म्हणाले, ‘बंदोबस्तासाठी नेमलेल्या हजेरी ही ड्यूटी कारकूनाकडून घेतली जाते. मात्र त्याबाबत आता प्रभारी निरीक्षकांकडून लक्ष घालून त्याचा दैनंदिन आढावा घेतला जाईल. होमगार्डच्या प्रत्यक्ष बंदोबस्ताच्या ठिकाणच्या उपस्थितीची तपासणी करुन त्याची नोंद रेकॉर्ड बुकवर ठेवली जाणार आहे. तसेच जानेवारी २०१४ च्या बनावट हजेरी व बिलाबाबत केलेल्या तपासाची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे.’ (प्रतिनिधी)