मुंबई : प्रशासक आणि सहकारी निबंधक कार्यालयाच्या जाचातून लवकरच गृहनिर्माण सहकारी संस्थांची सुटका होणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांतील सरकारी हस्तक्षेप कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले असून, लवकरच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक झाली. या वेळी भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह मुंबईतील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जवळपास तासभर चाललेल्या या बैठकीत सहकार मंत्र्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांना अडचणीतून मुक्त करण्याची घोषणा केली. ज्या सोसायट्यांमध्ये सहकारी निबंधकांनी प्रशासकांची नियुक्ती केली आहे तिथे येत्या ३० दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे या सर्व सोसायट्या प्रशासकांच्या कचाट्यातून मुक्त होतील, असे लोढा यांनी सांगितले. शिवाय जिथे सकृतदर्शनी एखाद्या निर्णयात आर्थिक गैरव्यवहार आढळत नाही, तिथे सोसायटीतील २० टक्के सदस्यांच्या संमतीविना अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करता येणार नाही. निबंधकांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची ९० दिवसांत सोडवणूक करणेही बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे लोढा यांनी सांगितले. आतापर्यंत कोणीही तक्रार केल्यास निबंधक स्वत:च प्रशासक नेमण्याचा निर्णय घेत. त्यामुळे हजारो सोसायट्यांचे कामकाज ठप्प झाल्याचेही लोढा म्हणाले. (प्रतिनिधी)
गृहसंस्थांची सुटका होणार
By admin | Published: December 04, 2014 2:56 AM