चार डॉक्टरांसह इस्पितळ सीईओची चौकशी
By admin | Published: December 6, 2015 02:46 AM2015-12-06T02:46:42+5:302015-12-06T02:47:37+5:30
किडनी तस्करी प्रकरण : नागपूर व औरंगाबादेतील डॉक्टरांचा समावेश!
अकोला : किडनी तस्करी प्रकरणात पोलिसांनी नागपूर येथील हॉस्पिटलचे दोन सोनोग्राफी तज्ज्ञ व औरंगाबाद येथील एका मोठय़ा हॉस्पिटलच्या दोन डॉक्टरांसह मुख्य कार्यकारी अधिकार्यास चौकशीसाठी शनिवारी अकोल्यात आणले. रात्री उशिरापर्यंंंत डॉक्टरांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर या डॉक्टरांना सोडून देण्यात आले व रविवारी ६ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपी देवेंद्र श्रीधर सिरसाट व आनंद भगवान जाधव गोरगरीब, गरजू व्यक्तींना हेरून त्यांना व्याजाने पैसा पुरवायचा आणि पैसा देण्यास असर्मथ ठरलेल्या व्यक्तींवर दबाव टाकायचा तसेच पैशांचे आमिष दाखवून त्यांची किडनी काढायची, असा गोरखधंदाच सुरू केला. संतोष गवळी आणि शांताबाई खरात यांची फसवणूक झाल्यामुळे त्यांनी किडनी तस्करी प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यानंतर डाबकी रोड पोलीस आणि जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल करून सिरसाट व जाधव यांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून नागपूर, औरंगाबाद येथील डॉक्टरांची (पान १ वरुन)
तसेच सांगली जिल्हय़ातील इस्लामपूर येथील शिक्षक शिवाजी कोळी याचेदेखील नाव समोर आले. माहितीच्या आधारे पोलिसांची तीन विशेष पथके नागपूरसह औरंगाबाद व सांगली येथे गुरुवारीच रवाना झाली होती.
आरोपीने केले आजारी असल्याचे नाटक!
किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी देवेंद्र सिरसाट व आनंद जाधवला न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश हरणे यांनी आरोपींना समोर हजर करण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींना न्यायाधीशांसमोर हजर करताच, त्यातील आनंद जाधवने उलटी होत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला बाहेर नेल्यावर मात्र, त्याने उलटी केली नाही. यानंतर त्याच्या विधिज्ञांनी तो आजारी असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने आरोपीला वैद्यकीय उपचारांची गरज पडल्यास, त्याला ते उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला.
वरिष्ठ अधिकारी, तपास अधिकार्यांचा प्रतिसाद नाही
नागपूर व औरंगाबादेतील चार डॉक्टर व एका हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यास ताब्यात घेतल्याबाबत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तपास अधिकारी जितेंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी डॉक्टरांना ताब्यात घेतल्याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
वैद्यकीय समिती नेमण्यासाठी 'एसपीं'चे पत्र
किडनी काढलेल्या पाच जणांची वैद्यकीय तपासणी करण्याच्या दृष्टिकोनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने वैद्यकीय समिती नेमावी आणि या समितीच्या देखरेखीत पाचही जणांची तपासणी करण्यात यावी, यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना पत्र पाठविले आहे.