भाजपचे निलंबित १२ आमदार सभागृहात कसे? काँग्रेसचे नाना पटोले यांचा विधानसभेत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 09:26 AM2022-03-10T09:26:01+5:302022-03-10T09:26:20+5:30
निलंबनाची मुदत संपण्याअगोदरच ते सभागृहात उपस्थित कसे राहतात? कुठल्या नियमाने सभागृहात बसतात?, याकडे पटोेले यांनी लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित केलेले होते, मग आता ते विधानसभेत कसे काय येत आहेत, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत केला.
गिरीश महाजन, जयकुमार रावल, आशिष शेलार, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, हरीश पिंपळे, योगेश सागर, नारायण कुचे, बंटी भांगडिया, पराग अळवणी, राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांना निलंबित करण्यात आले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. असे असले तरी नेमके कशाच्या आधारे या सदस्यांना सभागृहात बसण्याची अनुमती देण्यात आली, असा प्रश्न पटोले यांनी केला.
निलंबनाची मुदत संपण्याअगोदरच ते सभागृहात उपस्थित कसे राहतात? कुठल्या नियमाने सभागृहात बसतात?, याकडे पटोेले यांनी लक्ष वेधले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. याप्रकरणी भाजप आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर काही आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा उपाध्यक्षांकडे निवेदन देऊन आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निकालाची घोषणा केली. त्यानंतर विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची मुंबईत भेट घेत निवेदन दिले होते. त्यावेळी या १२ आमदारांचे निलंबन मागे घेतल्याचे सांगण्यात आले होते.
मुख्यमंत्री ठाकरे बसून बोलणार
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये बसून बोलणार आहेत. त्यासाठी विधान परिषद सभापती आणि विधानसभा उपाध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली आहे.
सूत्रांनी सांगितले की, बसून बोलण्याची परवानगी ठाकरे यांनी सभापती व उपाध्यक्षांकडे मागितली होती. त्यासाठी त्यांनी तब्येतीचे कारण दिले होते. ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जास्त वेळ उभे राहून बोलण्यास डॉक्टरांनी त्यांना मनाई केल्याची माहिती आहे.
नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे यांना मानेच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री गैरहजर होते. मुख्यमंत्री हजर राहू शकले नव्हते. त्यावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते.