लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही. यासंदर्भात अजूनही चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. यामुळे, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यातच आता लोकसभेच्या 16 जागा शिवसेना (शिंदे गट) लढणार असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
आम्हाला माहीत आहे आमचे काय बोलणे सुरू आहे -यासंदर्भात बोलताना आमदार संजय शिरसाट म्हणाले, "आम्हाला माहीत आहे आमचे काय बोलणे सुरू आहे. किती जागा मिळतील हा आकडा शिंदे साहेबांना माहीत आहे. इतर लोक काय म्हणतात यावर तुम्हीही विश्वास ठेऊ नका आणि आमचा तर नसतोच. म्हणून कमीत कमी 16 च्या पुढे ही फिगर जाईल, अशी आमची अपेक्षा आहे. 16 ते 18 दरम्यान जागा मिळतील एवढं मात्र निश्चित आहे. त्या पद्धतीनेच शिंदे साहेबांची बोलणी सुरू आहे." शिरसाट टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते.
तसेच, "पक्षाची वाढ करत असताना किंवा पक्ष मजबुतीने उभा करत असताना, खासदारही त्या ताकदीचे निवडून यायला हवेत. हा आमचा मानस आहे आणि त्यासाठी असलेला हा प्रयत्न आहे, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.