दहावी-बारावीची कसोटी : काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:34 AM2018-02-20T11:34:36+5:302018-02-20T11:40:34+5:30

उद्या(दि.21) 11 ते 2 या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

HSC exams begin tomorrow in Maharashtra | दहावी-बारावीची कसोटी : काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही !

दहावी-बारावीची कसोटी : काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही !

googlenewsNext

पुणे/पिंपरी : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. बारावी बोर्डाची परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळ सज्ज झाले आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. मात्र, या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो या परीक्षांचे दडपण झुगारून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे.
काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाही !
दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणा-यांची टक्केवारी खूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापास होऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वाटत असते. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणा-या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते.
पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) -9822334101 , एस. एल. कानडे (नगर) - 9028027353 , पी. एस. तोरणे
(सोलापूर) - 9960002957 या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात ही काळजी घ्या-
-पुरेशी झोप घ्या. कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या.
-अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या.
-लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.
-परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले.
-परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासवर भर द्यावा.
-संपूर्ण दिवस अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधे मधे छोटे ब्रेक, विश्रांती घ्यावी.
-आवडीच्या विषयाने अभ्यासाची सुरुवात करावी.
-परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांची वेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा.
-गरज वाटत असल्यास, मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
-प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसार सर्वच विषयांना थोडा-थोडा वेळ द्यावा.

बारावी परीक्षेसाठी सहा भरारी पथकांची नेमणूक-

नवी मुंबई : बारावी बोर्डाची परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबई विभागीय मंडळ सज्ज झाले आहे. मुंबई केंद्रावरील परीक्षा सुरक्षितरीत्या पार पडावी, तसेच परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये याकरिता पहिल्यांदाच बोर्डाच्या वतीने सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. दक्षता समितीसह जिल्हानिहाय प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी तसेच महसूल विभाग यांचे स्वतंत्र पथक असणार आहे. गेल्या वर्षी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिके मुळे यंदा विशेष खबरदारी घेत वर्गातच 10 वाजून 50 मिनिटाला प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यात येणार आहे.
बुधवारी 11 ते 2 या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी सुट्टीच्या दिवशी देखील बोर्डाचे कामकाज सुरू असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिका-यांनी दिली. सोमवारी पोलीस संरक्षणासह 14 गाड्यांमधून ठाणे, पालघर, रायगड केंद्रावर परीक्षेचे गोपनीय साहित्य पोहोचविण्यात आले तर मंगळवारी उर्वरित 13 गाड्यांमधून मुंबई विभागातील सर्व केंद्रावर साहित्य सुरक्षितरीत्या पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाने दिली. यावेळी केंद्र संचालक तसेच परीरक्षकांना परीक्षा नियमांचे पालन, घ्यावयाची काळजी याविषयी सूचना करण्यात आल्या. परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांशिवाय कोणालाही मोबाइलचा वापर करता येणार नसून, मोबाइल जमा करावे लागतील. केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स, टेलिफोन बुथ बंद राहणार असून नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करणार असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थींची संख्या कमी आहे आणि परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे.

Web Title: HSC exams begin tomorrow in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.