लोणावळा, दि. 21 - मुंबई-पुणे रेल्वे मार्गात पुन्हा विघ्न आले आहे. खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळ ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातानंतर हुबळी एक्स्प्रेस एक तास उशिरानं धावत आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावरुन मुंबईच्या दिशेने निघालेल्या हुबळी एक्स्प्रेसवर खंडाळा व कर्जत दरम्यान मंकी हिलजवळ दरड कोसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना पहाटे 5.30- 6 वाजण्याच्या सुमारास मंकी हिलजवळील डोंगरावरुन दरड एक्स्प्रेसवर कोसळली. यावेळी भीषण असा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली. यावेळी रेल्वे कर्मचा-यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू केले व काही वेळाने हुबळी एक्स्प्रेस आपल्या मार्गाकडे रवाना करण्यात आली. दरम्यान, जखमी प्रवाशांवर कर्जत येथील रेल्वे दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले.
जुलै महिन्यातही मंकी हिलजवळ रेल्वे रुळावर कोसळली होती दरडलोणावळ्यातील मंकी हिलजवळ जुलै महिन्यातही डोंगरावरून रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक खोळबंली होती. यावेळी रेल्वेतीलच प्रवाशांनी तत्परता दाखवत ट्रॅकवरील दगड बाजूला केले व रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली होती. ट्रॅकवर दगड पडल्याचे दिसताच पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या सिंहगड एक्सप्रेसच्या चालकाने गाडी तत्काळ थांबवली होती. या गाडीतील प्रवाशांनीही ट्रॅकवरील दगड बाजूला करून एक्स्प्रेसचा मार्ग मोकळा केला. सुदैवानं रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे कोणती जीवितहानी झाली नव्हती. पण याचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला होता. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. मंकी हिल येथून रेल्वे ट्रॅक जातो. पावसामुळे दरड रेल्वे ट्रॅकवर कोसळून दुर्घटना घडत आहेत.
18 जुलै 2017 : मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचं घसरलं होते इंजिन जुलै महिन्यातच खंडाळा घाटात मंकी हिलजवळ मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरुन घसरले होते. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार एक मोठा दगड घसरून रुळावर आला, तो इंजिनाला लागला आणि त्यामुळे इंजिनाचे चाक घसरले.