हुसैनी इमारत दुर्घटना: अन् कपाटामुळे जीव वाचला !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 10:07 PM2017-09-01T22:07:26+5:302017-09-01T22:09:52+5:30
इमारत कोसळण्यापूर्वीच काही मिनिटांपूर्वी रोजप्रमाणेच कामावर रुजू झालो होतो. ज्यावेळी इमारत कोसळायला लागली, त्यावेळी नेमके आजूबाजूला काय सुरु आहे ते कळलेच नाही.
मुंबई, दि. 1 - इमारत कोसळण्यापूर्वीच काही मिनिटांपूर्वी रोजप्रमाणेच कामावर रुजू झालो होतो. ज्यावेळी इमारत कोसळायला लागली, त्यावेळी नेमके आजूबाजूला काय सुरु आहे ते कळलेच नाही. कानठळ्या बसविणारा खूप मोठा आवाज आला आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तीच इमारत कोसळत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी काय करावे, कुठे जावे हे सुचतच नव्हते. गोडाऊनमध्येच पळापळ सुरू असताना कपाटाजवळ पोहोचताच इमारतीचा वरच्या स्लॅपचा मोठा भाग कोसळणार तितक्यात कपाट आडवे आल्याने बचावलो. याच कपाटाच्या आडोशामुळे ढिगाºयाखाली तग धरु शकलो, त्यानेच जीव वाचविल्याचे भेंडीबाजार इमारत दुर्घटनेतील अब्दुल सांगत होता.
हुसैनी इमारत पत्त्यासारखी खाली कोसळत असताना खाली गोडाऊनमधल्या कपाटामुळे २५ वर्षीय तरुणाचा जीव वाचला. अब्दुल लतिफ खान हा तरुण सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार घेत आहे. इमारतीच्या तळमजल्यात मिठाईचे गोडाऊन होते. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अब्दुल याच गोडाऊनमध्ये गेली आठ वर्षे मिठाई बनविण्याचे काम करीत होता.
काही कळायच्या आतच इमारत जमीनदोस्त झाली. मात्र मी बराच काळ ढिगाºयाखाली अडकलो होतो, बाहेर येण्याचा कुठलाच मार्ग दिसत नव्हता. कपाटाच्या आडोशाला असल्याने जीव वाचल्याचे सांगताना अब्दुलच्या डोळ््यांत घटनेच्या थरार दिसत होता. तब्बल तीन तासांच्या धडपडीनंतर प्रकाश दिसू लागल्याने त्या दिशेने बाहेर पडता येईल असे वाटले. त्यावेळेस हळुहळू प्रयत्नांती अखेर ‘पुनर्जन्म’च पदरी पडल्याची भावना मनात आल्याचे अब्दुलने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या इमारत दुर्घटनेत अब्दुलच्या डाव्या पायाला, उजव्या हाताला आणि डो्नयाला जखमा झाल्या आहेत. ढिगाºयाखालून मी सूखरूप बाहेर पडू शकलो; हे केवळ ‘अल्ला का रेहम’ असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचे संपूर्ण कुटुंब उत्तर प्रदेश या गावी राहत असून सध्या कळवा येथे राहणारी सख्खी बहिण त्याची देखभाल करीत आहे.
.... नोकरी जीवावर बेतली असती !
हजारो बेरोजगार अर्थाजनासाठी मुंबापुरीची वाट धरतात. त्याचप्रमाणे, तीन तरुण सुरक्षारक्षकाची नोकरी करत होते. त्यांच्या कंपनीने याच इमारतीत राहण्याची सोय केली होती. मात्र गुरुवारी हीच नोकरी त्यांच्या जीवावर बेतली असती, मात्र त्यातून त्यांनी कसेबसे बाहेर पडत आपला जीव वाचविला आहे. कर्नाटक, हरियाणा आणि पंजाब या राज्यातून सय्यद हुसैन, सलीम हुसैन आणि अन्य एक जण नोकरीसाठी मुंबईत आले. तिघांनाही सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळाली. अद्याप त्यांनी पहिला पगारही घेतला नव्हता. सकाळी साडे आठच्या सुमारास इमारत स्फोट झाल्याप्रमाणे हादरली. तिघांनीही जीवाच्या आकांताने धाव घेतली आणि काही वेळातच बचाव पथक दाखल झाले त्यांनतर त्यांच्या मदतीने तिघांचाही जीव वाचल्याचे सय्यदने सांगितला. मात्र कालची दुर्घटना आठवली तर दरदरुन घाम फुटतो असे त्याने सांगितले. जे जे रुग्णालयात सलीम आणि सय्यद उपचार घेत आहे