दहा भुजबळ, दहा खडसे एकत्र आले तरी मी त्यांना पुरून उरेन- दमानिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 07:36 PM2018-06-20T19:36:59+5:302018-06-20T19:36:59+5:30
एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज अंजली दमानिया जळगावमध्ये जबाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या.
जळगाव:एकनाथ खडसे हे सध्या त्यांच्या समर्थकांमार्फत माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी छगन भुजबळ यांना सोबत घेऊन लढण्याची घोषणा केली होती. मात्र, असे दहा एकनाथ खडसे आणि दहा छगन भुजबळ एकत्र आले तरी मला फरक पडत नाही. कारण माझी लढाई सत्याची आहे, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले.
एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आज अंजली दमानिया जळगावमध्ये जबाब नोंदवण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दमानिया यांनी म्हटले की, पराभव झाल्याने आणि सत्ता गेल्यामुळे एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे खडसे माझ्याविरुद्ध बेछूट आरोप करत सुटले आहेत. स्वत:च्या समर्थकांकरवी खडसे माझ्याविरुद्ध दाखल करत आहेत. काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी आता आपण भुजबळांना सोबत घेऊन लढू असे म्हटले होते. या दोन्ही नेत्यांचं अस्तित्व संपल्यानंतर ते एकत्र येत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसींसाठी नाही तर माझ्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत आहेत. मात्र, त्यामुळे मला काही फरक पडणार नाही. मी दहा भुजबळ आणि दहा खडसे यांना पुरून उरेल, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.