'बेळगाव पोलिसांनी मलाही मारहाण केली होती'; ठाकरे सरकारकडून व्यक्त केली एकच अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 07:33 PM2020-01-17T19:33:09+5:302020-01-17T19:34:47+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
नाशिक : सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगाव येथे गेलेले महाराष्ट्रातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शुक्रवारी सकाळी बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर शरद पवारांनीही त्यांना बेळगाव पोलिसांकडून मारहाण करण्यात आल्याचा अनुभव सांगितला. तसेच बेळगावातील मराठी लोकांच्या पाठीशी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणी कारखान्यांसाठी चर्चा सुरू आहे. त्यांना दिलासा कसा देता येईल हा प्रयत्न आहेत. चीन सरकार प्रतिनिधी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मी एकत्रित बैठक करून दिली आहे. द्राक्ष चायनाला पाठवण्यासाठी प्रयत्न असल्याचेही पवार यांनी सांगितले.
कांदा साठा धोरण आणि निर्यातबंदी रद्द करावी याकरिता मी दिल्लीत मंत्री पियुष गोयल यांना भेटणार, असल्याचे आश्वासनही पवारांनी दिले. विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात मी नाशिकमधून केली. बदल व्हावा ही युवकांची भूमिका होती. त्याचा आम्हाला फायदा झाला. तीन पक्षांचे सरकार बनविताना आम्ही काही निर्णय घेतले. यात युवकांना रोजगार, औद्योगिक धोरण ठरवलं, शेती पुनर्बांधणी धोरण ठरवलं. या सरकारनं सत्तेचा योग्य वापर करावा ही अपेक्षा पवारांनी उद्धव ठाकरे सरकारकडून व्यक्त केली.
राज्यातील 85 टक्के शेतकरी 2 लाख कर्जमर्यादेच्या आत आहेत. आता याच शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. उर्वरित शेतकऱ्यांचा विचार येत्या अंदाजपत्रकात केला जाईल, असेही पवार म्हणाले.