मी गुन्ह्याची कबुली देणार नाही! टकलाचा कोर्टात अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:49 AM2018-03-10T03:49:45+5:302018-03-10T03:49:45+5:30
गुन्ह्याची कबुली देणार नसल्याचे १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार मन्सुर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला (५७) याने गुरुवारी टाडा कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले आहे. घरगुती जेवण, योग्य उपचार, वकिलांसोबत १० मिनिटे बोलणे, कुटुंबाची भेट अशा स्वरुपाच्या त्याने दाखल केलेल्या ६ अर्जांपैकी एक गुरुवारीच मान्य करण्यात आला होता.
मुंबई - गुन्ह्याची कबुली देणार नसल्याचे १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार मन्सुर मोहम्मद फारुख उर्फ फारुख टकला (५७) याने गुरुवारी टाडा कोर्टात केलेल्या अर्जात म्हटले आहे. घरगुती जेवण, योग्य उपचार, वकिलांसोबत १० मिनिटे बोलणे, कुटुंबाची भेट अशा स्वरुपाच्या त्याने दाखल केलेल्या ६ अर्जांपैकी एक गुरुवारीच मान्य करण्यात आला होता. उर्वरित ५ अर्जांवर टाडा कोर्टात शुक्रवारी सुनावणी होती. मात्र ती पुढे ढकलली असून सोमवारी होणार आहे.
२५ वर्षांनी तपास यंत्रणेच्या हाती लागलेला टकला हा १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटातील मुख्य सूत्रधार आहे. दाऊदचा उजवा हात म्हणूनही त्याची ओळख आहे. गुरुवारी त्याला दिल्लीतून अटक केल्यानंतर तो १९ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत आहे. गुरुवारी त्याने टाडा न्यायालयाकडे ६ अर्ज केले होते. यापैकी वकिलांसोबत बोलू देण्याचा अर्ज मान्य करण्यात आला होता. उर्वरित पाच अर्जांवर शुक्रवारी सुनावणी होणार होती. त्यासाठी त्याला टाडा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याचा भाऊ अहमद लंगडाही तेथे हजर होता.
देशाच्या सुरक्षेला धोका पोहचेल असे कोणतेही कृत्य मी केलेले नाही. देशातील तसेच विदेशातील कोणत्याही गुन्हेगारी कारवाया करणा-या टोळीशी मी संबंधीत नसून कोणत्याही तपास यंत्रणा, न्यायालयासमोर जबाब दिलेला नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
टकलाने गुरुवारी न्यायालयात दिलेल्या अर्जांत, कोणत्याही तपास अधिकारी अथवा न्यायालयासमोर गुन्ह्याची कबुली देण्यासाठी तयार नसल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारच्या पुराव्यांसाठी जप्ती करू देणार नसल्याचेही स्पष्ट केले. जबाब नोंदविताना वकिलांना समोर ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्याने केली आहे. त्याच्या अर्जांवरील सुनावणी सोमवारी
होणार आहे.