मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र सध्या तरी मनसेसोबत युती शक्य नसल्याचे सांगत युतीबाबतच्या चर्चांवर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न केला. भविष्यात राज ठाकरे मित्र असू शकतात, मात्र याबाबतचा निर्णय केंद्रीय पातळीवरून होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे सध्या मशिदींवरील भोंग्याच्या विषयावर आक्रमक झाले आहेत. भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवू, असे सांगत राज्य सरकारला त्यांनी ३ मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. भाजप आणि मनसेची भूमिका समान असल्याने दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरू झाली. विरोधकांनी तर भाजपच्या पटकथेनुसारच राज ठाकरे भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मनसेसोबत सध्या तरी युती नाही. मनसेसोबत युतीचा निर्णय घ्यायचा असेल तर तो राष्ट्रीय पातळीवर घेतला जाईल.
एखाद्या पक्षाला सोबत घेण्याचा निर्णय राज्याची कोअर कमिटी घेत असते. परंतु, मनसेसोबतच्या युतीचा निर्णय मात्र केंद्रातच घेतला जाईल. परप्रांतीयांबाबत मनसेच्या भूमिकेबाबतही आम्हाला विचार करावा लागेल. त्यामुळे आज तरी युतीचा कुठलाही प्रस्ताव नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.