शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) अपमान ही क्षुल्लक गोष्ट असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तर भविष्यात याचे कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील निवडणुकीत मतदार उत्तर देतील. जर महाराजांचा अपमान करणाऱ्यांना कुठलाही पक्ष पाठीशी घालत असेल, तर तो पक्ष देशात ठेवायचा की नाही, हे आता मतदार ठरवतील, असे म्हणत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. हा पहिल्यांदाच झाला, असे नाही. यापूर्वीही कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढण्याचे काम झाले होते. याचा मी जाहीर निषेध करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना यासंदर्भात पत्र लिहून आवाहन केले आहे की, कर्नाटक सरकारला सांगून जे कोणी समाजकंटक आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. संपूर्ण देशाचा अपमान आहे. यावर कारवाई व्हायलाच हवी.
नारायण राणेंना टोला -विकास कामांच्या भूमिपूजनासाठी परस्पर विरोधी जर एकाच व्यासपीठावर येत असतील, तर ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, असं मला वाटतं. समोरासमोर आल्यावर एकमेकांवर टीका करायची, असे काही होऊ शकत नाही. महाराष्ट्राला ही राजकिय परंपरा आहे. पण काही लोक ही परंपरा विसरले आहेत, असे म्हणत सामंत यांनी यावेळी नारायण राणे यांनाही टोला लगावला.
याच बरोबर, पेपर फुटीसंदर्भात सर्व लोकांना अटक झाली आहे आणि त्यातून कुणीही सुटणार नाही. सरकार आपले काम करत आहे, असेही सामंत म्हणाले.
“आंतर भारती" आणि "ग्राममंगल" आयोजित समारंभात 'ग्राममंगल' या संस्थेच्या कार्याची ४० वर्षे व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांच्या वयाची ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान सामंत पत्रकारांशी बोलत होते.