मराठी बोलणार नसाल तर महापौरपद सोडा, मराठी एकीकरण समितीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 05:57 PM2017-10-16T17:57:00+5:302017-10-16T17:57:25+5:30
महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले.
मीरा रोड: मीरा-भाईंदर महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले. आंदोलनात अन्य संघटना आणि पक्षाचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते .
आज पालिकेची महासभा असल्याने सकाळी १०.३० वाजल्यापासून १२.३० वाजेपर्यंत समितीचे सदस्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आंदोलन केले . समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख , मीरा भाईंदर अध्यक्ष सचिन घरत, रेश्मा डोळस, प्रमोद पार्टे , विद्या बोधे , काजल चौधरी सह माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, जनसंग्रामचे सुहास सावंत , जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम , प्रदीप सामंत, गणेश दिघे, अजीम तांबोळी , समीर मालपाणी आदी देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
मीरा भाईंदर च्या महापौर डिंपल मेहता यांना मराठी बोलणे फारसे जमत नाही . शिवाय अनेक नगरसेवक देखील सर्रास अमराठी भाषेतून बोलतात . शासन आदेशा नुसार राजभाषा मराठीचा वापर कामकाजात केला पाहिजे . परंतु महापौरांसह अनेक नगरसेवक यांना मराठी येतच नाही किंवा थोडं फार येत असल्याने राजभाषा मराठीचा अवमान होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे . महासभा व अन्य सभा तसेच सर्व कामकाज मराठीतून व्हावे यासाठी समितीने आंदोलन केले .
आंदोलकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या . महासभेचे कामकाज मराठीत झालेच पाहिजे ; महापौर बाई मराठीत बोला , नाहीतर खुर्ची रिकामी करा ; मराठीचा अपमान सहन करणार नाही आदी लिहलेले फलक आंदोलकांनी धरले होते . आंदोलन शांततेत झाले. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी सर्व पक्षीय एकीकरणाच्या माध्यमातून एकत्र व्हायला हवे . मराठी भाषेसाठी आंदोलन म्हणजे इथे कोणाचा व्यक्तिक दोष नाही पण आपल्याच राज्यात आपली मराठी भाषा टिकावी हेच ध्येय. महापौरांनी स्वतः मराठी बोलून सर्वाना सभागृहात मराठी बोलण्यास भाग पाडावे अन्यथा महापौर पद सोडावे अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली .
राज्यसरकारने लोकप्रतिनिधींना मराठी सक्तीची करावी अन्यथा निवडणूक लढवून देऊ नये. समितीचे हे लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन होते. या पुढं मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याची गय केली जाणार नाही व उग्र आंदोलन केले जाईल असे सरचिटणीस कृष्णा जाधव व उपाध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी सांगितले.
भाजपाच्या महापौर डिंपल मेहता यांची आजची पहिलीच महासभा होती . डिंपल यांनी कसेबसे मराठीतून सभागृहाचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला . मधून त्या हिंदी बोलत होत्या . तर अनेक नगरसेवक देखील हिंदीतूनच बोलत होते . शिवसेना नगरसेविका तारा घरत यांनी महासभेत मराठीतून बोला असा आग्रह धरला .