पुणे – राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी यातील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. अजित पवारांना(Ajit Pawar) सांगू आमचं ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीत गेलेच आहेत असं जाहीर विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी व्यासपीठावरुन केले. त्यामुळे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना-भाजपा कधीही एकत्र येऊ शकतात याचे संकेत दिले आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये मेळाव्यावेळी राऊत म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री आपले आहेत. अजितदादाही मुख्यमंत्र्यांचे ऐकतात. पुणे जिल्ह्यात आपलं कुणी ऐकत नाही असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका नाहीतर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेलेच आहेत असं त्यांनी विधान करताच सभागृहात हशा पिकला. मात्र यानंतर राऊत यांनी विधानावर विनोदी शैलीनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका मग लिहा. उगाच ब्रेक्रिंग सुरू होईल. दिल्लीचे अंदाज बांधायला लागतील. आपल्याला दिल्लीवर राज्य करायचं. दिल्लीत ऑफिस कुठं आहेत. पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत असं त्यांनी म्हटलं.
पुढील महापौर आपलाच
खूप दिवस झाले भोसरीत मेळावा घ्यायचं प्लॅनिंग होतं. इथं स्टेजवर मोठी गर्दी आहे परंतु या भागात आपला एकही नगरसेवक नाही. त्यामुळे स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने ३ नगरसेवक निवडून आणले तरी महापालिकेत सत्ता आपली येईल. पुढील काळात पिंपरी चिंचवडचा महापौर आपलाच असेल. नुसतं पद आहे म्हणून नव्हे तर शिवसैनिकांच्या मनगटात ताकद होती म्हणून महाराष्ट्रात आपली सत्ता आली असंही राऊत यांनी सांगितले.
...अन्यथा स्वबळावर लढणार
मागील वेळी ४ प्रभाग होते तेव्हा आपल्याला फटका बसला मात्र इतरांना तो बसला नाही. म्हणजे आपलं संघटन कुठेतरी कमी पडतंय. परंतु आता आपल्याला सगळ्या जागा लढण्याची सवय ठेवली पाहिजे. आले तर तुमच्यासोबत नाही आले तर तुमच्याशिवाय असं अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसला इशारा दिला आहे. त्याचसोबत कोल्हापूरचा गडी पुण्यात आलाय पण त्याने आमच्या नादी लागू नये असंही राऊतांनी चंद्रकांना पाटलांना म्हटलं आहे.