प्रतिमा जपताहेत मोदी
By Admin | Published: May 10, 2015 12:20 AM2015-05-10T00:20:56+5:302015-05-10T00:20:56+5:30
काळ, काम आणि वेग या बीजगणितीय समीकरणात ‘रिटर्न आॅन इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणुकीवरील परतावा... हा घटक समाविष्ट केला की, अवतरणारा
मनोज गडनीस -
काळ, काम आणि वेग या बीजगणितीय समीकरणात ‘रिटर्न आॅन इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणुकीवरील परतावा... हा घटक समाविष्ट केला की, अवतरणारा दृश्य अवतार म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र. किती कमी वेळात किती अधिक परतावा यावर नफ्या-तोट्याचा आणि यशाचा तराजू तोलला जातो. पण जसजसा काळ पुढे सरकत चालला आहे आणि ज्या पद्धतीने अपेक्षापूर्तीचे चित्र रंगवले गेले होते त्याचा वेग मंदावल्याचे दिसल्यानंतर आता तेच कॉर्पोरट क्षेत्र हळूहळू वास्तव सांगायचे धाडस करू लागले आहे.
वास्तव आणि धाडस या शब्दाचा वापर तसा जाणीवपूर्वकच. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होताना देशातील कॉर्पोरेट क्षेत्राचे सरकारबद्दलचे मत हे केलेल्या घोषणा, दिलेली वचने यांचे वस्तुस्थितीच्या पातळीवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉर्पोरेट उद्योगाची मोदी यांच्याशी गुजरातच्या मुख्यमंत्री असताना असलेली जवळीक आणि आता पंतप्रधान झाल्यावर त्यात पडलेले अंतर, यामुळे काहीशी घुसमट होत असल्याचे दिसून येते. सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने काही प्रमुख उद्योगप्रमुखांची जाणून घेतलेली मते (आणि नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी दिलेली माहिती) संमिश्र जरी असली तरी पुरेशी बोलकी आहे. दिल्लीच्या हवेत सरकारबद्दल जशा राजकीय चर्चा रंगतात आणि किस्से कानावर येतात, तसेच मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वातही अशा चर्चा आणि किस्से कानावर पडत आहेत, त्याचा हा काहीसा कानोसा.