कणकवली : जळगाव येथील एका व्यापाऱ्याच्या आस्थापनाचे उद्घाटन करण्यासाठी गुरुवारी सनी लिओन येणार आहे. याविषयी रितसर पोलीस ठाण्यात जाऊन सनी लिओनवर तीन गुन्हे दाखल झाले असूनही ती उजळ माथ्याने सर्वत्र फिरत आहे. तरी तिला तत्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक विजय पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे. तसेच स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनीही या आस्थापनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जळगाव शहर पोलीस ठाण्यात याविषयी १५ मे रोजी तक्रार दाखल करायला गेल्यावर पोलिसांनी सनी लिओनविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. या पार्श्वभूमीवर सनी लिओन मोकाट फिरत असूनही पोलीसकारवाई का होत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सनी लिओन जळगाव येथे आल्यावर तत्काळ तिला अटक करावी व तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच तिच्याकडून होणारा उद्घाटन समारंभ रद्द करून समाजात अश्लीलता पसरवणाऱ्यांवर चाप लावावा, अशी पोलिसांकडून अपेक्षा आहे. पोलिसांनी या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतल्यास पोलिसांविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याविषयीही स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी सिद्धता केली आहे.डोंबिवली येथे सनी लिओन विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला देशातून हाकलावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हिंदू जनजागृती समितीने याविरोधात आॅनलाईन चळवळ आरंभली आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई, नालासोपारा, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, पनवेल, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज, धुळे, नंदूरबार, संभाजीनगर आदी, गोव्यात डिचोली, म्हापसा, मडगाव, तसेच मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतही २० हून अधिक ठिकाणी सनी लिओनविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. (प्रतिनिधी)सोलापूर, हलियाळ (कर्नाटक) येथेही गुन्हे दाखलअभिनेत्री सनी लिओनच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्यावतीने डोंबिवली पोलीस स्थानकात अश्लीलता पसरविण्यासंदर्भात गुन्हा नोंद झाला होता. आता या अश्लीलताविरोधी आंदोलनाला अन्य राज्यांतही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. गुरुवारी दुपारी सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध व्याख्यात्या अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी पोलीस ठाण्यात सनी लिओन समाजात अश्लीलता पसरवत असल्याविषयी तक्रार केली. या प्रकरणी सोलापूर येथील विजापूर नाका पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण साळुंखे यांनी सनी लिओनविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. तसेच कर्नाटक येथील हलियाळ शहर पोलीस ठाण्यात सनी लिओनविरोधात आणखी एक गुन्हा नोंद झाला असून, जिजामाता महिला संघाच्या अध्यक्षा मंगला काळशीकर यांनी या प्रकरणी तक्रार केल्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सनी लिओनला तत्काळ अटक करा
By admin | Published: May 22, 2015 9:34 PM