परीक्षेशिवाय मूल्यमापन करणे अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:27 AM2021-04-19T05:27:15+5:302021-04-19T05:27:24+5:30
अंतर्गत मूल्यमापनाबाबत शंका; परीक्षेविना उत्तीर्ण करणे उचित नसल्याचे तज्ज्ञांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई) देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १९ लाख आहे. महाराष्ट्रातील एकट्या एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल १६ लाख आहे. सीबीएसई बोर्डाला प्रवेश घेणारा वर्ग वेगळा आहे.
तो एसएससी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे केवळ एका राज्यातील १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना कोणत्याही मूल्यमापनाशिवाय म्हणजेच परीक्षेविना उत्तीर्ण करणे उचित ठरणार नाही, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. परंतु, अजमेर, भुवनेश्वर, पंचकुला, दिल्ली ईस्ट, गोहाटी, चेन्नई ,पाटणा, प्रयागराज, त्रिवेंद्रम, डेहराडून, चंदीगड, पुणे, बेंगलोर, भोपाळ आणि दिल्ली वेस्ट या विभागांतून २०२० मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
१९ लाख ४ हजार ७७२ एवढी होती. त्यात सीबीएसई बोर्डाच्या पुणे विभागातून केवळ ७६ हजार १७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
सीबीएसई बोर्डाने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याचे घोषित केले आहे. परंतु, एसएससी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या पद्धतीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळेच दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने अंतर्गत ‘गुणदान’ बंद केले होते. परिणामी परीक्षा न घेता एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे उचित होणार नाही.
त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घ्याव्यात, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.
परीक्षा घेऊनच या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे उचित ठरेल. सध्या मूल्यमापनाची वेगळी पद्धत आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेत परीक्षा घेणे अपेक्षित आहे.
- डॉ. शकुंतला काळे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
विद्यार्थ्यांचे करिअर दहावी बारावीच्या परीक्षांवर अवलंबून आहे. भावनेच्या आहारी जाऊन परीक्षा रद्दचा निर्णय घेतला तर भविष्यात या विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. परीक्षा या संबंधित विद्यार्थ्याच्या शाळेमध्येच घेता येऊ शकतात. परीक्षा सुरू असताना तेथे एक शासकीय निरीक्षक उपस्थित असावा. - डॉ. सुनील मगर, माजी संचालक, बालभारती