पेण - दर्जेदार आरोग्य सेवा असा दावा करणाऱ्या राज्याच्या आरोग्य विभागाचे डोळे कधी उघडतील, असा सवाल करण्याची वेळ पेण तालुक्यातील जिते गावात घडलेल्या घटनेवरून आली आहे. येथील एका बारा वर्षांच्या मुलीला सर्पदंश झाल्यानंतर मंगळवारी रात्रभर चार रुग्णालयांचे उंबरठे झिजवले, तरी उपचार न मिळाल्याने अखेर तिचा यात मृत्यू झाला आहे. सारा रमेश ठाकूर असे त्या मृत मुलीचे नाव आहे.
रात्री दीड वाजता घरात झोपलेली असताना विषारी सर्पाने दंश केला. तिच्या वडिलांनी तिला तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराची साधने नसल्याचे सांगण्यात आले. लागलीच तेथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्यांनी अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. अलिबाग रुग्णालयानेही उपचार करण्यास असमर्थता दर्शवली. शेवटी तिला कामोठेतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली. तिच्या आईचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. वडील लेकीला जिवापाड सांभाळत असताना तिला सर्पदंश झाला. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत लेकीला वाचविण्यासाठी तिचा बाप धडपडत होता. मात्र, त्याला यश आले नाही.
आमची सारा कुठं गेली? साराच्या मृत्यूची खबर मिळताच ठाकूर कुटुंबासह, गावातील शाळकरी मुले, शिक्षक, ग्रामस्थ, नातेवाईक यांनी शोक व्यक्त केला. शाळेतील आवडती विद्यार्थिनी सारा आता सातवीच्या वर्गात दिसणार नाही. याबाबत तिच्या वर्गमैत्रिणींनाही दुःख अनावर झाले. आमची सारा गेली कुठे, असा सवाल त्या हुंदके देत करीत होत्या.
सारा ठाकूर ही अलिबाग जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर तिच्यावर डॉक्टरांनी उपचार केले होते. मात्र, पेणमधून येईपर्यंत तिची तब्बेत नाजूक झाली होती. अलिबाग येथे उपचारानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबईकडे पाठविले. पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना या प्रकरणाबाबत माहिती देण्यास अलिबाग येथे बोलावण्यात आले आहे. त्यात दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल. -डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक
जिते गावातील सर्पदंशाची रुग्ण सारा रमेश ठाकूर वय वर्षे १२ हिला उपचारासाठी रात्री दोनच्या सुमारास दाखल करण्यात आली. तिच्यावर विषाची मात्रा कमी करण्यासाठी योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. केस आणतानाच गंभीर अवस्थेत होती. सतत उलट्या होत होत्या. अशा परिस्थितीत आयसीयू रूम नसल्याने आम्ही तिला अधिक उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अलिबाग येथे नेऊन उपचारासाठी पाठविले. - डॉ. राजपूत मॅडम, पेण उपजिल्हा रुग्णालय प्रमुख वैद्यकीय अधिकारी पेण